रस्ता दुरावस्था प्रकरणी ॲड. महेंद्र मांडवकर यांची रत्नागिरी नगरपरिषदेला नोटीस

रत्नागिरी:- साहेब.. जनता कर भरतेय… मग जनतेला सुखसोयी मिळायला नकोत का..?, शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खोदलेली गटारे यावरुन रत्नागिरी नगरपरिषदेच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न झाला असून ॲड. महेंद्र मांडवकर यांनी नगरपरिषदेला चक्क नोटीस बजावली आहे. 8 दिवसांत रस्त्यांवरील खड्डे न बुजवल्यास स्वखर्चाने शहरातील रस्त्यांवर डबर टाकण्याचा इशारादेखील ॲड. महेंद्र मांडवकर यांनी दिला आहे. 

रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अवस्था फारच बिकट आहे. बाजारपेठेत तर रस्ता आहे की गटार आहे, हेदेखील समजत नाही. तर इतर रस्त्यांचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होतो. नळपाणी योजनेसाठी नव्याने पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील सर्वच रस्त्यांची खोदाई झाली. काही ठिकाणी तर पावसाळ्यात रस्ते खोदण्यात आले. त्यामुळे शहरांत चिखलाचे साम्राज्य माजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या विरोधात अनेकांनी आवाज उठविला. मात्र पावसात काहीच करू शकत नाही, असे उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला.

या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरीतील तरुण वकील ॲड. महेंद्र मांडवकर यांनी थेट नगरपरिषद प्रशासनालाच नोटीस बजावली आहे. पहिली नोटीस 28/06/2021 रोजी पाठविली होती. मात्र त्यानुसार नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. नगरपरिषदेला आठवण करुन देण्यासाठी सोमवारी पुन्हा एकदा मुख्याधिकार्‍यांच्या नावे नोटीस पाठवण्यात आली आहे.

या नोटीसमध्ये ॲड. महेंद्र मांडवकर यांनी म्हटले आहे की, सर्वच रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत. या खड्‌ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात घडतायत. एखादा मोठा अपघात होऊन जिवीतहानी झाल्यास जबाबदार कोण? तर जिवीतहानी झाल्यानंतरच खड्डे बुजवणार का? असा प्रश्‍नदेखील ॲड. मांडकवर यांनी प्रशासानाला केला आहे. गॅस पाईपलाईन व पाणी लाईन यांचे कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिले आहे त्यांनी रस्ते पुर्वस्थितीत करणे आवश्यक आहे व त्यावर प्रशासन म्हणून अंकुश ठेवण्याची जबाबदारी मुख्याधिकार्‍यांची आहे.

दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी 15 ते 20 लाख रुपये खर्ची घातले जातात. मात्र हेच रस्ते दरवर्षी जैसे थे होतात. रत्नागिरीची जनता कर स्वरुपात प्रचंड रक्कम आपणाकडे जमा करते. एखाद्याने कर भरला नाही तर त्या व्यक्तीवर तातडीने कारवाई केली जाते. ज्या पद्धतीने कारवाईसाठी तत्परता दाखविली जाते त्याच तत्परतेने रत्नागिरीकरांचे हीत लक्षात घेतलेले नाही.

पुढील 8 दिवसांच्या आत शहरातील सर्वच रस्त्यांचे सर्वेक्षण करून तातडीने खड्डे भरण्याचे काम हाती घ्यावे, तसे न झाल्यास मी व माझे मित्रमंडळी मिळून स्वखर्चाने डबर टाकून खड्डे बुजवणार असल्याचे ॲड. मांडवकर यांनी या नोटीसीतून मुख्याधिकार्‍यांना कळविले आहे.