गावाकडे धाव, बाजारात भाजीचाही तुटवडा
रत्नागिरी:– संचारबंदीच्या कडक निर्बंधांमुळे सलग तिसर्या रविवारी मासे, चिकन, मटन विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यासाठी खवय्यांना पायपीट करुन गावागावातील दुकानदारांकडे धाव घ्यावी लागली. त्याबरोबरच बाजारात भाजीचाही तुटवडा जाणवत असून कोथींबीर अत्यल्प होती.
जिल्ह्यात संचारबंदी अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद केली. सकाळी 7 ते 11 या वेळेत भाजीपाला, किराणा दुकानांना विक्रीसाठी परवानगी दिली गेली. मात्र, वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने नसल्याने परजिल्ह्यातून भाजीपाल्यांची आवक अपेक्षेएवढी होत नाही. शनिवार, रविवारी त्याचा परिणाम दिसून आला. बाजारात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. कांदा 16 रुपयांवरुन 25 रुपये किलो, बटाटा 30 रुपये, गवार, फरसबी सारख्या भाज्या 60 रुपये, टोमॅटो 30, कोबी 30, वांगी व फ्लॉवर 50 रुपये, मिरची 70 रुपये, आलं 80 रुपये तर कोथिंबीरची एक जुडी 20 ते 25 रुपयांना मिळत आहे. रविवारी सकाळी कोथींबीरचा बाजरात तुटवडाच होता. शहराजवळील गावातून येणार्या पालेभाज्याही कमी असल्याने बाजार समितीमधून मिळणार्या भाजीवरच अवलंबून रहावे लागते. सकाळी चारच तास विक्रीसाठी परवानगी असल्याने विक्रेते जास्त माल खरेदी करण्याचा धोका पत्करत नाहीत. चवळी, लालमाठ, हिरवामाठ, मुळा, वाल व गावठी मेथी या भाज्याही 15 ते 20 रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत.
रविवारी मटण, चिकनसह माशांना प्रचंड मागणी आहे. बाजारात मासळी विक्रीवरही बंधने असल्याने खवय्यांची पंचाईत झाली आहे. शहरातील लोकांना चिकनसाठी पायपीट करावी लागत आहे. अनेकांना दोन-दोन आठवडे चव चाखायला मिळालेली नाही. कोंबडी 120 ते 140 रुपये तर कापून 240 रुपये किलोने विकले जात आहे. समुद्रातील मासळीही मुबलक नसल्याने दर वधारले आहेत. बांगडा 180 ते 200, कोळंबी 150 ते 450, सुरमई 450 ते 700, पापलेट 800 ते 1200, सरंगा 400 ते 500 रुपये किलो दर आहे.