फेरनिविदा काढण्याचा निर्णय; वाढीव दराचा विषय नामंजूर
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या नव्या इमारत बांधकामाच्या निविदा मंजुरीवरून सोमवारची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा 20.87 टक्के दराने भरलेल्या निविदेवर भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप नोंदवला. 2 कोटी 82 लाखांची वाढीव निविदा मंजूर केल्यास रनपवर आर्थिक बोजा पडणार आहे. आधीच पाणी योजनेचा बोजा असताना नव्या इमारतीसाठी भाववाढ देण्यास भाजपसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकमुखी विरोध नोंदवला. यामुळे जादा दराचे अंदाजपत्र आणि निर्माण कंपनीने भरलेली निविदा प्रक्रिया रद्द करून सुधारित अंदाजपत्र व निविदा प्रक्रिया करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
रनपची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विषय़ पत्रिकेवरील विषय़ांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये पहिलाच विषय पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा होता. नवीन इमारतीसाठी अंदाजपत्रकीय रक्कम १४ कोटी २८ लाख ५४ हजार आहे. या कामाच्या दुसऱ्यांदा काढलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला. नव्या इमारतीसाठी २ निविदा आल्या. त्यामधील स्पेकट्रम इन्फ्रास्ट्रक्चर यांना तांत्रिक लखोटा परिपूर्ण नसल्याने त्यांचा वित्तीय लखोटा उघडण्यात आला नाही. दुसरे मक्तेदार निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर यांनी अंदाजपत्रकीय दरापेक्षा २०.८७ टक्के वाढीव दराची निविदी सादर केली. तीन वर्षांत झालेल्या भाववाढीला अनुसरून अंदाजपत्रकापेक्षा 2 कोटी 82 लाख इतक्या जादा दराने निर्माण कंपनीने निविदा सादर केली.
या विषयावरून सभागृहात चांगलीच चर्चा रंगली. विरोधक समिर तिवरेकर, मुन्ना चवडे यांनी यावरून रनपच्या अभियंत्यांना फैलावर धरले. २० टक्के वाढीव दर द्यावा की देऊ नये, यावरून अभियंता सभेत चांगलेच गोंधळून गेले. त्यांनी वाढीव दराबाबत थेट उत्तर न देता ते विषय गोल-गोल घुमवू लागले. त्यामुळे श्री. तिवरेकर म्हणाले, आम्ही याबाबत रनपच्या कन्सल्टनला विचारणा केली. त्यांनी जास्तीत जास्त ९ टक्के वाढीव दराचा विचार करता येईल. असे असताना 20.87 टक्के वाढीव दर कुणी निश्चित केला अशी विचारणा करताच अधिकारी गोंधळून गेले. यामुळे रनपच्या फंडावर सुमारे ३ कोटीचा आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे याला आमचा विरोध आहे, असे श्री. तिवरेकर, चवंडे, राजू तोडणकर आणि उमेश कुळकर्णी यांनी सभागृहात स्पष्ट केले. तसे पत्र नगराध्यक्षांना दिले.
नगराध्यक्ष बंड्या साळवी देखील विरोधकांच्या भुमिकेशी सहमत झाले. त्यांनीही याला विरोध दर्शविला. शासनाने नव्या इमारतीसाठी ५ कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. उर्वरित निधी रनपने आपल्या स्तरावर उभा करावा, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मला सभागृहाचे मत पाहिजे. शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी याबाबत उभा राहुन आपला विरोध नोंदवावा, असे स्पष्ट केले. सेनेच्या सर्व सदस्यांनी उभा राहून वाढीव दराला विरोध केला. सर्वांचे एकमत झाल्यानंतर नवीन प्रशासकीय इमारतीचे अंदाजपत्र आणि निविदा प्रक्रिया रद्द करून सुधारित अंदाजपत्रक व निविधा प्रक्रिया करण्यात यावी, असा निर्णय सभागृहाने घेतला.