रनपचे २२१ कोटींचे खर्चाचे अंदाजपत्रक सादर; रत्नागिरीवासियांवर कोणतीही करवाढ नाही

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 225 कोटी 54 लाख 23 हजार ७७० रुपये जमेचे तर २२१ कोटी ९२ लाख २२ हजार १९६ खर्चाचे असे 3 कोटी ६३ लाख १ हजार ५७४ रुपये शिल्लकीच्या अंदाजपत्रकाला पालिका प्रशासनाने मंजुरी दिली. कोणतीही करवाढ नसणारे हे अंदाजपत्रक आहे. महसुली खर्च, भांडवली खर्च तसेच व्यवहार व कार्यक्रम अंमलबजावणीच्या खर्चाच्या तरतुदीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ करण्यात आली आहे. हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकाच्या माध्यमातून पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. प्रारंभी शिल्लक १९ कोटी ५६ लाख ३७ हजार, महसुली जमा ४७ कोटी ५८ लाख २७ हजार ९२२, भांडवली जमा १५८ कोटी ३९ लाख ५८ हजार ५४० असा एकूण २२५ कोटी ५४ लाख २३ हजार ७७० जमेचा तर महसुली खर्च ६३ कोटी ५२ लाख ६३ हजार ६५५, भांडवली खर्च १५८ कोटी ३९ लाख ५८ हजार ५४० मिळून एकूण २२१ कोटी ९२ लाख २२ हजार १९६ खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये पालिकेच्या मालमत्तांपासून मिळणारे अंदाजित उत्पन्न ८० लाख २२ हजार आहे. गेल्या वर्षी हे उत्पन्न ६७ लाख ३२ हजार होते. आस्थापनेवरील खर्चाची तरतूद गतवर्षांपेक्षा ८ कोटीने वाढवून ती २८ कोटी २७ लाख ४९ हजार एवढी केली आहे. प्रशासकीय खर्चही वाढला असून, त्यासाठी ३ कोटी ८३ लाख १५ हजार एवढी तरतूद करण्यात आली आहे. व्यवहार व कार्यक्रम अंमलबजावणीसाठी २२ कोटी ४ लाख ३ हजाराची तरतूद केली आहे. राखीव निधीची तरतूदही ६ कोटी ९९ लाख ९० हजार करण्यात आली आहे.