रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या अग्निशमन दलाने गेल्या वर्षभरात सुमारे ६२० आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवत मोठे अनर्थ टाळले आहेत. अग्निशमन दलाच्या या तत्परतेचे नेहमीच कौतुक होते. मोकळ्या जागेतील गवत, कचरा, पालापाचोळा यांना आग लागण्याचे प्रकार अधिक आहेत. शार्टसर्किटमुळेही आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. या घटनांमध्ये सुमारे १२ ते १३ लाखाचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी अग्निशमन दलाला गेल्या चार वर्षांमध्ये काहीसे बळ मिळाले आहे. दलामध्ये अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत अन्यथा एका अग्निशमन बंबावर अवलंबून राहावे लागत होते. त्यानंतर फिनोलेक्स कंपनीचाच मोठा आधार होता; परंतु आता तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नामुळे एमआयडीसीचेही स्वतंत्र अग्निशमन दल उभारण्यात आले आहे. त्यामुळे कुठेही आग लागली तरी या तिन्ही दलातर्फे आगींवर नियंत्रण मिळवता येते. पालिकेच्या अग्निशमन दलाने गेल्या वर्षभरात रत्नागिरी शहर आणि परिसरातील वणव्याने लागलेली आग असो, शॉर्टसर्किटने लागलेली आग असो वा अन्य कशाने संदेश मिळताच तेथे तत्परतेने दाखल होते. त्यानंतर फायरमन जीवाची बाजी लावून या आगीवर नियंत्रण मिळवतात जेणेकरून पुढील अनर्थ टळावा यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असतो. वर्षभरात आगीच्या ६२० घटना घडल्या आहेत. पालिकेच्या अग्निशमन दलाने त्यावर नियंत्रण मळवून मोठी हानी टाळळी आहे. या सर्व प्रकारामध्ये एकूण १३ लाखाचे नुकसान झाले आहे. यामध्ये साळवी स्टॉप येथे डम्पिंग ग्राउंडला आग लागण्याचे प्रकार अधिक आहेत.