जिल्हाधिकारी; मतदारसंघात १ हजार ९४२ मतदान केंद्र
रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची जिल्हा प्रशासन, निवडणुक विभाग आणि पोलिस दलाने पुर्ण तयारी केली आहे. १ हजार ९४२ मतदान केंद्रांवर सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १२ तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने उद्यापासून यंत्रणा जोरदार सक्रिय होणार आहे. दोन्ही जिल्ह्याच्या सिमेसह चेकपोस्ट व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी ६१ भरारी पथके तैणात करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवडणुक अधिकारी श्री. गायकवाड आदी उपस्थित होते. श्री. सिंह म्हणाले, लोकसभा निवडणुक लागल्यानतंर महिन्याचा आढावा घेण्यात आला. आतापर्यंत ५६ बैठका घेऊन निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे. मतदारसंघात एकुण १४ लाख ३८ हजार ४७१ मतदार आहेत. तर १ हजार ९४२ मतदान केंद्रांवर सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रॅम्प, पाणी, वीज, टेबल, खुर्ची, आदीचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त म्हणजे ७५ टक्के मतदान व्हावे, यासाठी आमचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मच्छीमारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
नोकरीनिमित्त परजिल्ह्यात, परदेशात असलेल्यांच्या संपर्कात यंत्रणा आहे. स्थलांतरित झालेल्यांनाही त्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. तसेच ८५ वर्षावरील मतदारांनाही घरबसल्या मतदान करण्याची तयारी झाली आहे. सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्या समोर इलेक्ट्रॉनिक ओटिंग मशीन त्यांच्यासमोर तपासून सील करण्यात आल्या. त्याचे चित्रिकरणही करण्यात आले आहे. २ हजार ९०१ मशीन असून त्याचे वाटप करण्यात आले आहे. ९५९ अतिरिक्त मशीन ठेवण्यात आल्या आहेत, तीन ऑब्जरवर आयोगाने नियुक्त केले आहेत. यामध्ये कोलकत्ताचे अंकुर गोयर, जम्मुकश्मीरचे राहुल यादव आणि पोलिस दलाचे ओरीसाचे ऑब्जरवर येणार आहेत, अशी माहिती श्री. सिंह यांनी दिली.