रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या बदलाचे साक्षीदार असणारी 65 ते 70 वर्षांपूर्वीची वास्तू अखेर जमीनदोस्त झाली. नवे बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्याकडे जात असताना, जुन्या शहर बसस्थानकाची इमारत पाडण्याचे काम पुर्ण झाले. जुन्या पिढीची साक्षीदार असणारी ही इमारत जमीनदोस्त झाली. येत्या महिनाभरात नवीन बसस्थानकाचा प्रारंभ होणार आहे.
रत्नागिरीमध्ये नवीन एसटी स्टॅण्ड उभे राहत असताना सुरुवातीला लांबपल्ल्यांच्या स्थानक तोडण्यात आले. गेले अनेक वर्षे रखडलेल्या या बसस्थानकाच्या कामाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिल्याने गती आली आहे. बसस्थानकाचे काम आता अंतिम टप्प्याकडे आले आहे. इमारत पूर्ण झाली आहे. नवीन एसटी स्डॅण्डमध्ये लांबपल्ल्याच्या गाड्या वरच्या भागात आणि शहरी वाहतुकीसाठी खालील भागात रचना करण्यात आली आहे. त्यामुळे बस स्टॅण्डवर बसेस लावताना योग्य प्रकारे नियोजन व्हावे यासाठी जुने शहर बसस्थानक तोडण्याचे काम मागील चार-पाच दिवसांपासून सुरु आहे. शहर बसस्थानकाची ही इमारत साधारण 65 ते 70 वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती, असे एसटीच्या निवृत्त कर्मचार्यांनी सांगितले. जुने बसस्थानक तोडल्याने जास्तीतजास्त बसेस उभ्या करण्यासाठी जागा निर्माण होणार आहे. दरम्यान, जुन्या पिढीची साक्षीदार असलेली ही इमारत पडल्याचे दु:खही अनेक कर्मचार्यांनी व्यक्त केले.
बसस्थानक होणार मोकळे
ही इमारत एवढी चांगल्या स्थितीत होती की, या इमारतीमधील स्टीलला अद्यापही गंज लागला नाही. त्यामुळे ही इमारत किती मजबूत स्थितीत होती, हे लक्षात येत असल्याचे एसटीच्या कर्मचार्यांनी सांगितले. जुन्या इमारतीचा मलबा हटवल्यानंतर बसस्थानक अधिक मोकळे होणार आहे.