रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात एका महिलेसह दोघांनी मिळून एका व्यक्तीची तब्बल ५३ लाख १३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी एका हयात नसलेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे खोटे सांगून फिर्यादीला ही रक्कम गूगल पे द्वारे पाठवण्यास भाग पाडले. फसवणूक केल्यानंतर, फिर्यादीने पैसे परत मागितल्यावर आरोपी महिलेने राजकीय ओळख आणि मुस्लिम लोकांच्या नावाने धमक्या दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलताफ हशमत साखरकर (वय ३६, सध्या रा. धनजी नाका, रत्नागिरी) यांची आरोपी अब्दूलसमद अलीमिया जयगडकर (रा. मांडवी रोड, रत्नागिरी) आणि प्रमिला हिंदूराय माटेकर उर्फ आयु पाटील (रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी फसवणूक केली.
आरोपींनी फिर्यादीला सना शेख नावाच्या एका मृत व्यक्तीच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे खोटे नाटक रचले. यावर विश्वास ठेवून फिर्यादी साखरकर यांनी वेळोवेळी एकूण ५३ लाख १३ हजार ५०० रुपये आरोपी क्रमांक २ प्रमिला माटेकर हिच्या गूगल पे खात्यावर पाठवले.
फिर्यादीने जेव्हा आरोपींकडे आपले पैसे परत मागितले, तेव्हा संशयित आरोपी प्रमिला माटेकरने त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. तिने फिर्यादीला सांगितले की तिची राजकारणात मोठी ओळख आहे आणि मुस्लिम लोक घरी येऊन पैशांची मागणी करतात, अशी खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली.
या फसवणूक आणि धमकीच्या प्रकारानंतर फिर्यादी अलताफ साखरकर यांनी ०७ एप्रिल २०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अब्दूलसमद जयगडकर आणि प्रमिला माटेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(२) (फसवणूक), ३५१(२) (धमकी देणे) आणि ३ (५) (गुन्हेगारी कट) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.









