रत्नागिरी शहरात आढळले ३ मृत पक्षी; पक्षी तपासणीसाठी पुण्याला रवाना

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात अचानक मृत पक्षी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तिन्ही मृत पक्षांना तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. 
 

शहरातील आठवडा बाजार येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एक टिटवी पक्षी मृतावस्थेत आढळल्यानंतर आरोग्य सभापती निमेश नायर यांनी या घटनेची गांभीर्याने दाखल घेत तत्काळ सबंधित यंत्रणा कार्यन्वित केली. त्यातच गुरुवारी सकाळी नगरसेवक बाबा नागवेकर यांच्या घराजवळ २ मृत कावळे आढळून आले. याची कल्पना पशुसंवर्धनचे सहाय्यक आयुक्त डॉ. पानवलकर यांना देताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. 

या तीनही मृत पक्षांना आता तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. पुण्यामध्ये स्क्रीनिंग झाल्यावर यात काही संशयास्पद वाटत असल्यास हे पक्षी भोपाळ येथे पाठवले जाणार आहेत. संपूर्ण अहवाल येण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना पाठोपाठ बर्ड फ्ल्यूचे नवे संकट घोंगावत आहे. दापोली इथे देखील अशाच पद्धतीने कावळे सापडल्यावर खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर येथील आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे.