रत्नागिरी:- शहरातील महेश दगडू गुरव यांच्या घरातून सुमारे २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची चैन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सन्मित्रनगर येथील बाळ क्षीरसागर आणि एका महिलेविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ मे २०२४ पूर्वीच्या कालावधीत घडली.
जेल रोडवरील बालाजी स्कायचॅलेट, लांजेकर कंपाऊंड येथे राहणारे फिर्यादी महेश दगडू गुरव (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ मे पूर्वी कधीतरी आरोपींनी त्यांच्या घरी येऊन कपाटातील ५५ ग्रॅम वजनाचे २ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ११ ग्रॅम वजनाची ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन त्यांच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या एकूण २ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा शोध सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.