रत्नागिरी शहरातील विहिरींची पाणी पातळी अचानक घटल्याने खळबळ

रत्नागिरी:- वाढत्या शहरीकरणामुळे रत्नागिरी शहरातील पाणी उपशात मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. शुक्रवारी सकाळी अचानक शहरातील शिवाजीनगर भागातील सुमारे 5 ते 6 विहिरींच्या पाणी पातळीत अचानक घट होऊन खडखडाट निर्माण झाला. अचानक ही स्थिती उद्भवल्यामुळे रत्नागिरी शहर पाणी टंचाईच्या संकटाखाली आले आहे. एका भागातील पाणी पातळी घटल्यामुळे इतर भागातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी शहरात टोलेजंगी इमारती उभ्या रहात आहेत. प्रत्येक इमारतीत कूपनलिका, विहिरी खोदल्या जात आहेत. त्यातून लाखो लिटर पाण्याचा नेहमीच उपसा केला जातो. शिवाजीनगर हा भाग समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे. परंतु शिवाजीनगर भागात पिढ्यान्‌‍पिढ्या पाण्याचा स्त्रोत उत्तम होता. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खाजगी विहिरीही याच भागात आहेत. येथून टँकरद्वारे शहरातील बहुतांशी भागात पाणी पुरवठा केला जातो. परंतु त्याच भागातील विहिरींची पाणी पातळी घटल्याने रत्नागिरीकरांवर पाणी टंचाईचे संकट येण्याची शक्यता आहे.
गुरूवारी सायंकाळी शिवाजीनगर येथील विहिरींमध्ये मुबलक पाणी होते. परंतु शुक्रवारी सकाळी विहिरींचे पंप सुरू करण्यासाठी नागरिक गेल्यानंतर विहिरीमध्ये खडखडाट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही गोष्ट शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर कोरड्या झालेल्या विहिरी पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी गर्दी केली होती.

याबाबत भूजल विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी वाढत्या उष्म्यामुळे किंवा अतिपाणी उपशामुळे पाणी पातळीत घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विहिरींमधील पाण्याचे नमुने, पाणी पातळी घेण्यात आली आहे. परंतु कोणत्याही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत घट झाल्याचे निष्पन्न झालेले नाही. शिवाजीनगर येथील परिसरात असलेल्या विहिरींच्या पाणी पातळीत का घट झाली याचे स्वतंत्रपणे संशोधन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.