रत्नागिरी शहरातील तीन चोऱ्यांमध्ये सातजणांना अटक

गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

रत्नागिरी:- शहरात विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यातील संशयित आरोपीना शोधण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. त्यांच्याकडून सोन्याचा ऐवजासह चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. बंद घरे हेरून ती फोडण्यासाठी ही टोळी सक्रिय होती. यामध्ये दोन महिलांचाही समावेश असून सोन्याचे दागिने सोनाराकडे बँकेत ठेवून त्यावर कर्ज काढून ही टोळी पैसे वाटून घेत होती पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.

रत्नागिरी शहरातील तीन वेगवेगळ्या चोऱ्या झाल्या होत्या त्यापैकी शिरगाव साखरतर येथील बंद कर फोडून चोरट्याने 55 ग्रॅम सोन्यासह 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. दि.१५ ते १६ जुलै दरम्यान हि चोरी करण्यात आली होती.घरमालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या भागात असलेल्या सराई चोट्यांवर लक्ष केंद्रित करून पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अब्रार युसुफ हुजू (३५, रा शिरगाव) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्या खास शैलित चौकशी केल्यानंतर हुजूने चोरीची कबुली देत चोरीचा ऐवज शहर पोलिसांचा ताब्यात दिला आहे.

शहरातील मांडवी येथील जोंधळ्या मारुतीचे बंद मंदिर फोडून आतील दानपेटी, पितळीची समई लांबविणाऱ्या चोरट्याला दोन दिवसात पोलिसांनी अटक केले आहे. प्रथमेश सुगम व त्याची महिला साथीदार यांनी ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांची टोळी असून त्यांनी जिल्ह्यातील पाच बंद मंदिरे फोडून आतील साहित्य लांबविले आहे. त्यामध्ये राजापूर, रत्नागिरी व देवरुख येथील मंदिरांचा समावेश आहे.

शहरातील कुवारबाव उत्कर्ष नगर येथील रवींद्र गोविंद जाधव यांचे बंद घर दि. 15 जुलै च्या रात्री फोडून आतील सोने,टीव्ही साहित्य लांबविले होते. रवींद्र जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शहर पोलीस स्थानकाच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने सराईत चोरट्यांवर लक्ष केंद्रित केले होते. मिरकरवाडा येतील जुनेद जाफर मस्तान, रेहान बाबामिया मस्तन, वसीम नजीर सोलकर चोरीचा दिवशी या परिसरात सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसले होते. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी रवींद्र जाधव यांचे बंद कर फोडून आतील सोने लांबविण्याची कबुली पोलिसांना दिली. चोरी केल्यानंतर लांबविलेले सोने आपल्या महिला साथीदाराच्या नावावर शहरातील एका बँकेत ठेवून चौघांनी पैसे काढले होते याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.

तिन्ही चोऱ्यातील सात आरोपींना गजाअड करण्यासाठी पोलिसांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याद्वारे गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांची चौकशी केली. त्यानंतर या चोऱ्या करणाऱ्या आरोपीना अटक केली. हि कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपू साळवी, अमोल भोसले, आशिष भालेकर, भालचंद्र मयेकर,अमित पालवे, अरुण चाळके राहुल जाधव यांनी केली.