रत्नागिरी शहरातील तळ्यांमध्ये जलपर्णी, शेवळांचेच साम्राज्य

रत्नागिरी:- शहरातील तळ्यांना मोकळा श्‍वास घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या स्वच्छ राहणारी हीच तळी उन्हाळ्यात जलपर्णी, शेवाळांनी भरली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात या तळ्यांमध्ये पोहण्याचा आनंद मुलांना लुटता येत नाही. या तळ्यांच्या सुशोभीकरणासाठी पालिकेने ठोस कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे.

रत्नागिरी शहरात सुमारे पाच तलाव आहेत. चारशे ते पाचशे वर्ष जुने असलेले हे तलाव पूर्वी पाणीसाठ्यासाठी वापरले जात होते. काळाच्या ओघात हे तलाव अस्वच्छच होत गेले आणि त्यामुळे विहिरी व नगरपालिकेच्या नळपाणी योजनेतून पाण्याचा वापर केला जाऊ लागला. तेली आळीच्या नाक्यावरील तळे १६०० मधील असल्याचे सांगितले जाते. सुमारे पंधरा फूट खोल असलेल्या या तळ्यात शेवाळामुळे पाणी हिरवे झाले आहे. खराब पाण्यामुळे आता पोहण्यासाठीही मुले येत नाहीत. पूर्वी या तळ्याचा वापर पोहण्यासाठी व शेतीसाठी केला जायचा. या तळ्याच्या कोपर्‍यात प्रसिद्ध गोडी बाव आहे. राजिवडा येथील काशिविश्‍वेश्‍वर मंदिराच्या शेजारी असलेले तळे फार प्राचीन काळातील आहे. चाळीस फूट लांब, तीस फूट रुंद व पंधरा फूट खोल असलेल्या तळ्याची अवस्था बिकट आहे. येथील बांधकामाची पडझड झाली आहे. तसेच शेवाळही वाढले आहे. ग्रामदैवत भैरीच्या मंदिराच्या आवारातील तळ्याचे बांधकाम सन १५२६ मध्ये करण्यात आले आहे. दोन भागांत विभागलेल्या या तळ्याचा उपयोग सर्व भाविकांना होत होता. मात्र आता पाणी साठून राहत नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत या तळ्याचा उपयोग होत नाही. शहरातील ऐतिहासिक तळ्यांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे पाण्याचे स्त्रोत नामशेष होण्याची शक्यता आहे. परटवणे येथील तळ्यामध्ये जलपर्णी फोफावली आहे. परटवणे येथे सत्यनारायण मंदिराला लागूनच हे ऐतिहासिक तळे आहे. मच्छीमार्केट परिसरामधील तलावालाही जुनी पार्श्‍वभूमी आहे. शहरातील ही जुनी तळी उन्हाळ्यात दुर्लक्षित राहिल्याने तेथे जलपर्णी, शेवाळांनी भरली आहेत. या तळ्यांचे सुशोभीकरण केल्यास त्याचा फायदा पर्यटनाच्यादृष्टीनेही होऊ शकतो. याकडे पालिकेकडून गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा ही तळी कायमस्वरुपी दुर्लक्षितच राहणार आहेत.

पावसाळ्यापूर्वी करणार स्वच्छता

शहरातील काही तलाव नगरपालिकांच्या कक्षेत आहेत. त्यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काही ठिकाणी पंप लावून शेवाळ काढली जाईल, असे नगरपालिका स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले. जे तलाव देवस्थानच्या जवळ आहेत, त्यांचीही स्वच्छता केली जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

.