रत्नागिरी:- रत्नागिरीच्या भविष्यातील गरजा आणि नागरी सुविधांच्या विस्तारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नगरपरिषदेचे वाढते कामकाज लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाले असून, मे महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या रत्नागिरी विमानतळाचा आढावा सामंत यांनी यावेळी घेतला. विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात असून टर्मिनल बिल्डिंगचे कामही वेगाने पूर्ण होत आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच रत्नागिरी विमानतळ प्रवाशांसाठी सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे कोकणच्या पर्यटनाला आणि उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाली होती, त्याच वेळी राज ठाकरेंचा विश्वासघात होईल आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला जाईल, असे भाकीत मी केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. मुंबईतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून हे आता स्पष्ट झाले आहे. मैत्री आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, मात्र काही लोकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीपूर्ण भेटीचा जळफळाट होत असून त्यातूनच पोटशूळ उठत असल्याची टीका त्यांनी केली.
शक्तीपीठ महामार्गाबाबत भूमिका स्पष्ट करताना सामंत म्हणाले की, हा महामार्ग राज्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. राज्यातील प्रमुख शक्तीपीठे या मार्गावर असल्याने त्याला हे नाव देण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणेच हा प्रकल्प यशस्वी केला जाईल. मात्र, हा प्रकल्प राबवताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय केला जाणार नाही; शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रशासन पुढे जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेवटी, कोकणातील आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले. अवकाळी पावसामुळे किंवा अन्य कारणांमुळे ज्या बागायतदारांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. कालच बागायतदारांची बैठक पार पडली असून, लवकरच मी स्वतः महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बागांमध्ये जाऊन पाहणी करणार आहे, जेणेकरून नुकसानग्रस्तांना तातडीने दिलासा देता येईल असे ना. सामंत यावेळी म्हणाले.









