रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या फ्लॅटफॉर्म नं १ येथे रेल्वे पोलिसांना संशयित तरुण आढळला. चौकशी केली असता त्याला त्याच्याकडील असलेल्या वस्तुंबाबत स्पष्टीकरण देता आले नाही. रेल्वे पोलिसांनी लेखी रिपोर्टनिशी शहर पोलिस ठाण्यात हजर केले. पोलिसांच्या तपासात त्याच्याकडून ३२ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
संतोषकुमार अशोककुमार कुपगीरमठ (२९, रा. मल्लीकार्जुन रोड, जोशी गल्ली, हुमनबाद जि. बिदर राज्य कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ७) रात्री साडे अकराच्या सुमारास रेल्वे फ्लॅट फॉर्म १ येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास रेल्वे सुरक्षा पोलिस फ्लॅट फॉर्मवर गस्त घालत असताना एक संशयित प्रवासी आढळला. त्याच्याकडे ३० हजाराचा लॅपटॉप, ५०० रुपयांची काळ्या रंगाची इअर बडस,१ हजार किमतीचे काळ्या व लाल रंगाचे सॅक, ब्ल्युटूथ, इअरफोन्स, ५०० रुपयांचा चार्जर आदी साहित्य होते. रेल्वे पोलिसांनी या वस्तु बाबत चौकशी केली असता त्याला स्पष्टीकरण देता आले नाही. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ते थेट शहर पोलिस ठाण्यात हजर केले. पोलिसांच्या तपासात संशयिताकडे चोरीचा मुद्देमाल असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कौस्तुभ जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी त्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.