रत्नागिरी:- मच्छीमार्केट येथील चर्चसमोरील रस्त्यावर पोलिसांनी कारवाई करत ७ ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ, १८२ पुड्या आणि मोबाईल असा एकूण सुमारे १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नर्ममोहम्मद दिलमोहम्मद खान ऊर्फ कल्लू (वय २५, रा. भाजी मार्केटसमोर, रत्नागिरी) आणि मस्तान मगदम शेख (वय २६, रा. आजगावकरवाडी, बाजार, रत्नागिरी) यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १.३५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार शासकीय वाहनाने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे परिसरात गस्त घालत होते. माळनाका एसटी स्टँड, झारणी रोड आणि मच्छीमार्केट परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना मच्छीमार्केट येथील चर्चसमोरील रस्त्यावर संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी संबंधित व्यक्तीची तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ व इतर साहित्य बाळगल्याचे आढळून आले.
कारवाईत ७ ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ, त्याच्या १८२ पुड्या, अंमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली प्लास्टिकची पिशवी तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपराज प्रकाश पाटील यांनी फिर्याद दिली असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६२/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) व २१(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.









