रत्नागिरी:- जिल्ह्यातील एका अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण गाजत असतानाच या प्रकरणातील पोलिसांना हवा असलेला संशयित ठाणे पोलिसांच्या हाती लागला आहे. रत्नागिरीतून गूढरीत्या बेपत्ता झालेल्या या संशयिताला संगमेश्वर पोलिस नऊ महिन्यांपासून जंग जंग पछाडत होते.
अखेर क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने डोंबिवली जवळच्या उंबार्ली गावातील घरात लपलेल्या मोस्ट वाँटेड बदमाशाच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रेम एकनाथ शिंदे (वय २१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन तरूणीचे सुमित संजय लोध आणि प्रेम एकनाथ शिंदे या दोघांनी अपहरण केले होते. त्यानंतर सदर तरूणीवर संजय लोध याने प्रेम शिंदे याच्या मदतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दोन्ही अपहरणकर्त्या बदमाशांच्या कचाट्यातून सुटका करवून घेतलेल्या तरूणीने २२ जानेवारी रोजी संगमेश्वर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या संदर्भात भादंवि कलम ३६३, ३६६, ३७६ (२) (जे) (एन), ३७६ (३), १०९ सह बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्याचे कलम ४, ६, ९ (एल)/१० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तेव्हापासून फरार आरोपी प्रेम शिंदे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. हा बदमाश उंबार्ली रोडला असलेल्या एका खोलीत चोरीछुपे राहत असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे पोना सचिन वानखेडे यांना खासगी गुप्तहेराकडून मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय माळी, अनुप कामत, विश्वास माने, बापूराव जाधव, सचिन वानखेडे, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे या पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास डोंबिवली जवळच्या उंबार्ली रोडला असलेल्या मंदाधाम चाळीतील ७ क्रमांकाच्या खोलीवर अचानक छापा टाकला. पोलिसांना पाहताच साखर झोपेत असलेल्या मोस्ट वॉन्टेड प्रेम शिंदे याची बोबडीच वळली. शेजारच्या खोलीत राहणारी आई संगीता हिला अटकेची माहीती दिल्यानंतर आरोपी प्रेम शिंदे याला संगमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. नऊ महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीला जेरबंद करणाऱ्या क्राईम बँचच्या कल्याण युनिटचे ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त जयजित सिंग, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त नीलेश सोनावणे यांनी कौतुक केले आहे.