रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथे झालेल्या चोरीचा अवघ्या बारा तासात छडा लावण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील चोरट्याला या चोरी प्रकरणात स्थानिक अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सर्व मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे.
रत्नागिरीतील गोळप येथे अज्ञात चोरटयाने बंद घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरातील 3,37,500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस ठाणे येथे २९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याची उकल व्हावी यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन सदर पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुचना दिल्या. सदर पथकाकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरु होता. सदर पथकाने विविध ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याआधारे सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार जलील सोलकर याने केल्याचे निष्पन्न केले.
आरोपी जलील अब्दुल्ला सोलकर (वय 61 वर्षे, रा. कर्ला मोठया मशिदीजवळ, ता.रत्नागिरी) याला 12 तासाचे आत अटक करुन त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेले 2,43,000 रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. आरोपी जलील अब्दुल्ला सोलकर हा रत्नागिरी शहरामधील रेकॉर्डवरील सहाईत गुन्हेगार असून त्याचेवर घरफोडी व चोरीचे एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचा पुढील तपास पुर्णगड सागरी पोलीस ठाण्यामार्फत सुरु आहे. ही कारवाई पोहेकॉ सुभाष भागणे, पोहेकॉ विजय आंबेकर, पोहेकॉ सागर साळवी, पोहेकॉ 265 योगेश नार्वेकर, पोहेकॉ दिपराज पाटील, मपोहेकॉ वैष्णवी यादव, पोना दत्तात्रय कांबळे यांनी केली.