रत्नागिरी-पावस मार्गावर रिक्षा पलटी; चालकासह तिघे जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावर गोळप धार येथे श्री. गोगटे यांच्या बागेजवळ ०२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकासह तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पुर्णगड सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश प्रभाकर शिंदे (पोहवा/१३ नेमणुक पुर्णगड सागरी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आरोपी नंदकुमार राजाराम मोहिते (वय ४७ वर्षे, रा. इंचलकरंजी, नाट्यगृहाजवळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हा त्याच्या ताब्यातील रिक्षा (क्रमांक एम.एच./०९/ई.एल./५१३०) रत्नागिरीहून पावसकडे घेऊन जात होता.

यावेळी त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता, निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात गाडी चालवली. त्यामुळे रस्त्याच्या डाव्या बाजूच्या कच्च्या मातीच्या साइडपट्टीवर, तेथील लोखंडी गार्डला रिक्षा आदळली आणि पलटी झाली. या अपघातात स्वतः नंदकुमार मोहिते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.याप्रकरणी पुर्णगड सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि म.मो.वा.का.क १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.