रत्नागिरी:- शहरातील परटवणे परिसरात जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या सहा जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत घटनास्थळावरून पोलिसांनी ७ हजार ४३० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेले काही दिवसांपासून परटवणे परिसरात जुगार मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता एका आंब्याच्या बागेत राजरोसपणे जुगार अड्डा सुरू झाल्याने परिसरातील काही तरुण जुगार खेळण्यासाठी त्या ठिकाणी जात होते. परटवणे बोरकर वाडी परिसरात फिनोलेक्स गेस्ट हाऊसच्या मागील बाजूस एका आंब्याच्या झाडाखाली हा जुगार अड्डा सुरू झाला होता. या जुगार अड्डया विरोधात वारंवार तक्रारी झाल्या मात्र पोलीसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. आठ दिवसांपूर्वीच या ठिकाणी अशीच कारवाई झाल्याची माहिती पुढे आली परंतु ही कारवाई कागदावर आली नाही.
रविवारी दुपारपासून काही तरुण या अड्ड्यावर एका आंब्याच्या झाडाखाली बैठक घालून जुगार खेळत असल्याची माहिती शहर पोलीस स्थानकाच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली ही माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश कुबडे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र फुटक हे अन्य एका सहकाऱ्याला सोबत घेऊन फोर्ट परिसरात दाखल झाले या ठिकाणी दोन पंच बोलवण्यात आले होते या पंचना कारवाई का केली जात आहे त्याची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर रीतसरपणे शहर पोलीस स्थानकाच्या गुप्तवार्ता विभागाने परटवणे येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकली.
पोलिसांची धाड पडतात जुगार खेळणाऱ्या तरुणांनी तेथून निसटण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सहा जणांना रंगेहाथ पकडले तर दोन तरुण घटनास्थळावरून पळून गेले.
ही कारवाई रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली ताब्यात घेतलेल्या तरुणांना शहर पोलीस स्थानकात आणण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांमध्ये राजेंद्र शिवाजी क्षीरसागर (वय ५१, बोरकवाडी,परटवणे), कैलास विनायक शिर्के (वय-३१, परटवणे), रतिष विनायक शिर्के (३६, परटवणे) राकेश मनोहर पाटील(४०, परटवणे) अमोल शिवगण आणि अमोल मुरकर अशी संशयितांची नावे असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.