भाजप, शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक; बांधकाम अभियंत्यांवर कारवाईचा निर्णय
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत चार वर्षातील प्रशासकीय कामकाजाचे भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी अक्षरशः वाभाडे काढले. शौचालय दुरुस्तीवरील खर्च, कुत्रे निर्बीजीकरण आणि मोकाट गुर पकडण्यासाठी केलेला खर्च, कर्मचाऱ्यांच्या साहित्य खरेदीवर खर्च झालेले लाखो रुपये आणि महानगर गॅस कंपनीला दाखवण्यात आलेली मेहरबानी यावरून नगरसेवकांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अक्षरशः पळताभुई थोडी केली.
रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकी नंतरची पहिलीच सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारात झालेल्या कामावरून नगरसेवक आक्रमक झाले. सभेच्या सुरुवातीच नगरसेवक राजेश तोडणकर यांनी कुत्रे नसबंदी आणि मोकाट जनावरांना पकडण्यासाठी झालेल्या खर्चावरून आवाज उठवला. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार कुत्रे नसबंदी आणि मोकाट जनावरांना पकडण्यासाठी तब्बल 25 लाख इतका खर्च करण्यात आला असल्याची माहिती समोर आली. इतका निधी खर्च करून देखील शहरातील प्रश्न आहे तसाच आहे. या खर्चाची चौकशी. होणे गरजेचे असल्याची मागणी नगरसेवक राजेश तोडणकर यांनी केली.
उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी बांधकाम अभियंता पहिल्याच सर्वसाधारण सभेला गैरहजर असल्यावरून प्रश्न उपस्थित केला. पहिल्याच सभेला सर्व खातेप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी राहण्याचे आदेश नगराध्यक्ष यांनी दिलेले असताना बांधकाम अभियंता गैरहजर कसे असा सवाल समीर तिवरेकर यांनी मुख्याधिकारी यांना केला. यावेळी मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची रजा मंजूर करण्यात आली नसल्याची माहिती सभागृहाला दिली. यानंतर नगरसेवक अधिक आक्रमक होत बांधकाम अभियंता यांची रजा नामंजूर करून कारवाई देखील झाली पाहिजे अशी आक्रमक मागणी केली.
शहरातील के सी जैन नगर येथे नगर परिषदेच्या जागेत बांधण्यात आलेल्या अनधिकृत गाळ्यांवर तत्काळ कारवाई करा असे आदेश नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. याबाबत नगरसेविका स्मितल पावसकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की येथील जागेचा विकास करताना विकासकाने संबंधित जागा नगर परिषदेच्या ताब्यात दिली असून आजही ही जागा नगर परिषदेचीच आहे. जागा नगर परिषदेच्या ताब्यात असताना या जागेवर गाळे उभे कसे राहिले असा प्रश्न स्मितल पावसकर यांनी उपस्थित केला. जागा नगर परिषदेची मग त्या गाळे मालकाना नगर परिषदेकडे पत्रव्यवहार करण्याचा अधिकारच नसून या गाळ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष सुर्वे यांनी हे गाळे तत्काळ जमीनदोस्त करा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
सन 2025-26 मध्ये साहित्य खरेदीवर नगर परिषद प्रशासनाने 11 लाख रुपये खर्ची टाकले आहेत. 84 कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर हा निधी खर्ची टाकण्यात आला असल्याची माहिती नगरसेवक राजेश तोडणकर आणि समीर तिवरेकर यांनी सभागृहात दिली. एका कर्मचाऱ्यामागे 13 ते 14 हजार इतका खर्च दाखवण्यात आला. प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्यांना ना हँडग्लोज मिळाले, ना गमबुट, ना मास्क किंवा इतर कोणते साहित्य. मग हे 11 लाख रुपये गेले कुठे असा सवाल सभेत करण्यात आला. याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सभागृहात करण्यात आली.
महानगर गॅस कंपनीने शहरात केलेल्या खोदकामाचा मुद्दा नगरसेवक निमेश नायर आणि सौरभ मलुष्टे यांनी उचलून धरला. महानगर गॅस कंपनीने शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. खोदलेले रस्ते अद्याप तसेच आहेत. महानगर कंपनीने भरलेले 2 कोटी 83 लाख रुपये प्रशासकीय काळात अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची बिले देण्यात खर्ची टाकले. विशेष म्हणजे या निधीतून रस्ते पूर्ववत करणे किंवा सफाई कर्मचाऱ्यांचे पगार करणे आवश्यक होते. मात्र यावेळी अधिकाऱ्यांचे ठेकेदार प्रेम उफाळून आले असा आरोप यावेळी करण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे महानगर कंपनीकडून रक्कम भरून घेताना 30 लाख कमी भरून घेण्यात आल्याचा आरोप निमेश नायर यांनी केला. 2 कोटी 83 लाख रुपये भरून महानगर कंपनी रत्नागिरीची मालक असल्यासारखी रस्ता खोदत सुटली असून या कंपनीची परवानगी रद्द करा अशी मागणी नायर यांनी केली. याला नगराध्यक्ष सुर्वे यांनी दुजोरा देत संबंधित कंपनीची परवानगी रद्द केली जाईल असे सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छतागृह दुरुस्ती कामात मोठा घोळ घालण्यात आल्याचा आरोप उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी उपस्थित केला. प्रत्येक स्वच्छतागृहाच वेगवेगळ बिल आवश्यक असताना अधिकाऱ्यांनी चार शौचालयांच मिळून एक बिल बनवलं. बिल बनवताना पाच लाखा पर्यंतच बिल तयार करण्यात आले. जेणेकरून टेक्निकल सेंक्शन घेताना आणि बिल अदा करताना अडचणी येणार नाहीत. मांडवी येथील शौचालयच काम झालेले नसताना बिल अदा करण्यात आल्याचा आरोप यावेळी तिवरेकर यांनी केला. या सर्व प्रकरणांची चौकशी करून वसुली लावण्यात यावी अशी मागणी यावेळी सर्व नगरसेवकांनी केली. तसेच या प्रकरणा मागे असलेल्या बांधकाम अभियंत्यांवर चौकशी करून कारवाई करावी असा निर्णय यावेळी घेण्यात आला.









