रत्नागिरी तालुका पारंपारीक मच्छिमार संघर्ष संघटनेची स्थापना

रत्नागिरी:- प्रखर विजेच्या झोताचा (एलईडी लाईट) वापर करुन केल्या जाणार्‍या मासेमारी विरोधात लढण्यासाठी स्थापन केलेल्या रत्नागिरी तालुका पारंपारीक मच्छिमार संघर्ष संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विशाल मुरकर यांची निवड करण्यात आली.

रत्नागिरी तालुक्यातील पारंपारीक मच्छीमारांची बैठक मिर्‍या येथे झाली. त्यात प्रमुख मच्छिमारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रत्नागिरी जिल्हा मच्छिमार नौका चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष राजन सुर्वे यांनी पारंपारीक मच्छीमारांना एकत्र आणले. या बैठकीत श्री. सुर्वे यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. रत्नागिरी तालुक्यातील पारंपारीक मच्छीमारांवर कारवाई झाली तर ती सर्वांनी एकत्र मिळून त्याविरोधात लढा उभारायचा असे ठरविण्यात आले. प्रत्येक गावागावात जाऊन पारंपारिक मच्छीमारांना भेटून जागृती केली जाईल. पारंपारीक मच्छिमारांची नौका जर एलईडी लाईटसाठी दिली असेल तर त्याची चौकशी करून नौका मालकाला समज देण्यात येणार आहे. त्याने ऐकले नाही तर संबंधितावर मत्स्य विभागामार्फत कारवाईसाठी प्रयत्न केले जातील. पारंपारीक मच्छिमारांच्या लढ्यासाठी पुढील निर्णय रत्नागिरी जिल्हा मच्छिमार नौका चालक-मालक संघटनेशी चर्चा करुन घेण्यात येणार आहे, असे छोट्याशेठ भाटकर, गुरुदत्त कीर यांनी बैठकीत सांगितले. मच्छिमार नेते आप्पा वांदरकर यांनी रत्नागिरी तालुका पारंपारीक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष विशाल मुरकर यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष विशाल मुरकर, उपाध्यक्षपदी तेजस प्रकाश, गुरुनाथ शिरगावकर, अमरेश धातकर, दिलीप सुर्वे, सचिव दत्तगुरु कीर, खजिनदार किशोर माईण, सदस्य म्हणून दिपक पाटील, अमित विलणकर, विनायक मयेकर, विरेंद्र नार्वेकर, पंकज पिलणकर, श्रीदत्त भुते, अतुल भुते यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागारपदी आप्पा वांदरकर, खलिल वस्ता, वामन शेटये, दिनेश सावंत, रणजित भाटकर यांची निवड झाली.