रत्नागिरी झाडगाव येथे जुगार अड्डयावर धाड; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरीतील 6 जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील झाडगाव येथे बेकायदेशीर जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून 6 लाख 60 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जुगार खेळणार्‍या 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना 26 जून रोजी सायंकाळी 6 वा. च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाडगाव लघु उद्योग परिसरात तीनपत्ती जुगार खेळ पैसे लावून खेळवला जात आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी झाडगाव लघु उद्योग परिसरातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर धाड टाकली. या धाडीत 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. राजेश कोळेकर (43, विश्वनगर, मारुतीमंदिर, रत्नागिरी), प्रशांत महाजन (49, साईनगर, कुवारबाव, रत्नागिरी), अमोल शेटये (26, साईशक्ती अपार्टमेंट नाचणे), दयानंद रमेश गुरव (28, मारुती मंदिर, रत्नागिरी), देवानंद सुर्वे (झाडगाव लघुउद्योग परिसर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्याची जणांची नावे आहेत.

त्यांच्याकडे स्वीफ्ट डिझायर कंपनीची चारचाकी, सुमो कंपनीची सिल्व्हर रंगांची चारचाकी, 22 हजार 200 रु. किंमतीची रोख रक्कम, 5 मोबाईल, टेबल, खुर्च्या व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 6 लाख 60 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. वरील 6 जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.