रत्नागिरी:- स्वतःचा उद्योग उभारा, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आम्ही देतो, कच्चा माल देखील आम्हीच पुरवतो व तयार झालेले उत्पादन देखील आम्हीच खरेदी करतो असे आमिष दाखवत रत्नागिरीतील एमआयडीसी मधील एका कंपनीने अनेकांची रक्कम थकवल्याची घटना समोर आली आहे. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच अनेकांनी पोलीस स्थानकात धाव घेतली.
फसवणूक झालेल्यांमध्ये गरीब बेरोजगारांपासून राजकीय पुढाऱ्यांचा देखील समावेश आहे. मंगळवारी ग्रामीण पोलिसांनी या कंपनीत भेट दिल्याची देखील माहिती मिळत आहे. उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सामग्री देतो असे सांगत अनेकांकडून लाखो रुपये घेऊन या कंपनीचे संचालक आता गायब झाल्याचे बोलले जात आहे. येथे उपस्थित असणारा कर्मचारी वर्ग येथे पैसे परत मागायला आलेल्यांच्या रोषाला बळी पडत आहे. या कंपनीचे तीनही संचालक सध्या फोन उचलत नाहीत. कंपनीतील कर्मचारी वर्गाच्या मागे लागल्यावर एखाद दुसऱ्याला केवळ पुढील तारखेचा चेक देण्यात येतो. मात्र असे देण्यात आलेले चेक देखील न वाटल्याने अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
सुमारे दीडशेहून अधिक कर्मचारी या कंपनीत काम करतात. यांचे पगार देखील थकले असल्याचे बोलले जाते. २५ हजारांपासून ३ लाखांपर्यंतची गुंतवणूक हाजारो लोकांनी या कंपनीत केली आहे. मात्र आता कुणाचेच पैसे परत केले जात नसल्याने अनेकांना आपण फसले गेल्याची जाणीव आता होऊ लागली आहे.
सोशल मिडीयावर उद्योग व्यवसाय उभारण्याचे व्हिडीओ टाकून या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्यात येते. मात्र गुंतवणूक करूनही अनेकांना कोणतेच सामान, यंत्रसामुग्री अथवा कच्चा माल न मिळाल्याने आता पैसे परत घेण्यासाठी अनेकांनी या कंपनीत धाव घेतली आहे. या कंपनीने दोन ठिकाणी मोठी स्टोअर्स देखील उघडली होती पण या ठिकाणी देखील सर्व माल पडून असल्याचे बोलले जात आहे. कंपनीचे तीनही संचालक स्थानिक असून आता ते कुणाचाच फोन उचलत नसल्याचे बोलले जात आहे. एकंदर उद्योग व्यवसायाच्या नावाखाली करोडो रुपयांची फसगत झाल्याची चर्चा आता ऐकायला मिळत आहे.