रत्नागिरीला मुसळधार दणका; भातशेती पाण्याखाली

रत्नागिरी:- मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. नदी किनारी भागातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. गुहागर तालुक्यात आरे, असगोली पुलावर पाणी ठिकठिकाणी पाणी भरले असून रत्नागिरी तालुक्यात भंडारपुळे येथे भरतीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे गणपतीपुळेकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रघुवीर घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी (ता. 7) 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 83 मिमी पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड 76, दापोली 70, खेड 40, गुहागर 70, चिपळूण 37, संगमेश्‍वर 104, रत्नागिरी 114, लांजा 135, राजापूर 104 मिमी पाऊस झाला. 1 जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 2135 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेले दोन जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. रविवारी सकाळपासूनच पावसाने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे गुहागर तालुक्यातील छोट्या-मोठ्या नद्यांनी पात्र सोडून वहायला सुरवात केली. आरे येथे पाणी किनार्‍यावरील घरात शिरले. तेथील लोकांनी सुरक्षीत ठिकाणी धाव घेतली. कोतळूक कासारी नदीला प्रथमच आलेल्या पुरामुळे भातशेती पाण्याखाली गेली होती. पुलावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. दापोली पालगड येथे रुक्मीणी कदम यांच्या घराजवळ दगड, माती कोसळून घर आणि गोठ्याचे नुकसान झाले होते. साखरी त्रिशूळ येथे दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली. रत्नागिरी तालुक्यात भंडारपुळे येथे पाऊस आणि खाडीच्या भरतीचे पाणी रस्त्यावर आल्याने गणपतीपुळेकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. संगमेश्वर तालुक्यातील कासे-पुर्ये तर्फे सावर्डे रस्त्यावर दरड कोसळली असून वाहतूक थांबवण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात वाशिष्टी नदीने इशारा पातळी गाठली असून सकल भागातील रस्ते जलमय झाले आहेत. चिपळूण शहरात पालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मार्कंडी, चिंचनाका, वडनका आणि वाशिष्ठी नदीच्या किनारचा भाग जलमय झाला आहे.