रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलाचे अत्यंत महत्वाचे ”रत्नागिरी शहरात पाळत ठेवणारा प्रॉजेक्ट” चे काम करणे बंधनकारक असताना प्रोटोकॉल वन इट लॅब्स प्रायव्हेट लि. या कंपनीने शासनाची ४३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली तसेच शासकीय कामात अडथळा केला. या प्रकरणी कंपनीच्या दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत गोपाळ थवानी व कुलदीप एराम (संचालक प्रोटोकॉल वन इट लॅब्स प्रा. लि) अशी शासनाची फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. ही घटना १७ जानेवारी २०२३ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे अत्यंत महत्वाचे शहरात पाळत ठेवणारा प्रॉजेक्ट अंतर्गत शहर परिसरात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे यांची देखभाल करणे, पुरवठा आदेशा प्रमाणे कामकाजाची पुर्तता करणे बंधनकारक असताना प्रोटोकॉल वन इट लॅब्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक संशयित हेमंत थवानी व कुलदीप एरम यांना जाणीव असतानाही अटी व शर्थीचा भंग करुन शासनाची एकूण ४३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करुन सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक, पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग पोलिस अधिक्षक कार्यालयाचे उमेश आव्हाड (वय ४६, रा. शंकेश्वर मधूबन हाऊसिंग सोसायटी माळनाका-रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी कंपनीचे संचालक संशयित हेमंत थवानी व कुलदीप एराम यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.









