रत्नागिरी:- शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत सांगलीहून आणलेला तब्बल ५ किलो ५५.५ ग्रॅम वजनाचा आणि ३ लाख २५ हजार ५०० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मन्सुर अली निजाम पठाण (वय ४०, रा. मिरज, जि. सांगली) याला अटक केली आहे. या कारवाईमुळे रत्नागिरी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असल्याची माहिती मिळत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी शहरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचारी गोपनीय माहिती गोळा करत होते.
दिनांक ०७/०४/२०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर आणि पोलीस कर्मचारी कोकणनगर ते प्रशांत नगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी साईभूमी नगर इमारतीच्या मागील बाजूस त्यांना एक व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना दिसली. पोलिसांनी तात्काळ त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव मन्सुर अली निजाम पठाण असल्याचे सांगितले.
पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पाच तपकिरी रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये उग्र वासाचा गांजा सदृश अंमली पदार्थ मिळून आला. या पदार्थाचे वजन ५ किलो ५५.५ ग्रॅम असून त्याची किंमत ३ लाख २५ हजार ५०० रुपये आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर, सपोफौ दिपक साळवी, पोहेकॉ अरुण चाळके, अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर, पोकॉ अमित पालवे आणि कौस्तुभ जाधव यांनी केली.
आरोपी मन्सुर अली निजाम पठाण याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत. परराज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा रत्नागिरी जिल्ह्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.









