रत्नागिरीत शिमग्याचा उत्साह शिगेला; ना. सामंत यांनी लुटला ढोलवादनाचा आनंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या शिमग्याचा उत्साह शिगेला पोहचला आहे. शिमग्यासह लोकसभा निवडणुकीचे वातावरण देखील हळूहळू तयार होत आहे. गावागावात पालख्यांचे आगमन आणि लोकसभेचा उमेदवार याबाबतचं चर्चा सुरू आहेत. अशातच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हेही दरवर्षीप्रमाणे आपल्या पाली गावातील लक्ष्मी पल्लीनाथ मंदिराच्या शिमगोत्सवात सहभागी झाले आणि त्यांनी ढोलही वाजवला. आपल्या राजकीय धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत त्यांनी ढोल वादनाचा आनंद लुटला.

शिमगा आणि कोकणाचे नाते खूप जुने. वर्षभर भाविक देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. पण शिमग्यामध्ये देव मंदिरातून बाहेर पडून पालखीत बसून भाविकांच्या घरोघरी जातात. देव घरी येणार म्हणून घरांची रंगरंगोटी केली जाते. अंगण सारवून रांगोळी घातली जाते. केवळ पालखी घरी येणार म्हणून लांबलांबच्या शहरात नोकरी करणारे कोकणवासीय आपले घर गाठतात.

रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे लक्ष्मी पल्लीनाथाचा शिमगोत्सवही धुमधडाक्यात सुरू झाला आहे. हे मंत्री उदय सामंत याचे गाव असल्याने येथील शिमगोत्सवाला ते दरवर्षी हजेरी लावतात. गुरुवारी रात्रीही त्यांनी येथे हजेरी लावली आणि ढोल वादनात सहभागही घेतला.