रत्नागिरीत मुलाचा वृध्द वडिलांवर जीवघेणा हल्ला

भीक मागून जमा केलेले पैसे देण्यास नकार दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका ७६ वर्षीय वृद्ध पित्याला, स्वतःच्या सावत्र मुलाने पैशांच्या वादातून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध पिता जखमी झाला असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी गंगाराम गनू घोडेकर (वय ७६) हे मूळचे लांजा तालुक्यातील पणोरे गावचे असून, सध्या रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास ते रेल्वे स्थानक परिसरात बसून दिवसभरात भीक मागून जमा झालेले पैसे मोजत होते.

​यावेळी त्यांचा सावत्र मुलगा अर्जुन भिवा पवार (वय ३८) याने त्यांच्याकडे खर्चासाठी पैशांची मागणी केली. मात्र, गंगाराम यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या नकाराचा राग मनात धरून अर्जुनने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

​वाद वाढल्यानंतर आरोपी अर्जुनने जवळच असलेला लाकडी दांडका उचलला आणि वडिलांच्या डाव्या डोळ्याच्या वर आणि उजव्या हाताच्या बोटांवर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात गंगाराम हे गंभीर जखमी झाले आहेत.

​याप्रकरणी गंगाराम घोडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी पोलिसांनी आरोपी अर्जुन पवार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, रक्ताच्या नात्यातील या क्रूर कृत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.