ग्राम रोजगार सहाय्यकांचा आजपासून बेमुदत संप
रत्नागिरी:- कमी मानधन आणि शासनाकडून होणारी सततची दुर्लक्षता याला कंटाळून रत्नागिरी तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी १ फेब्रुवारीपासून सर्व ग्राम रोजगार सहाय्यक बेमुदत संपावर जात आहेत. विशेष म्हणजे, ‘मनरेगा’मधील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
गेल्या १० वर्षांपासून हे कर्मचारी गावागावात मनरेगाची कामे अतिशय निष्ठेने करत आहेत. मस्टर काढणे, जिओ टॅगिंग, ई-केवायसी आणि प्रशासकीय प्रस्ताव सादर करणे अशी कष्टाची कामे करूनही त्यांच्या पदरात अत्यंत तुटपुंजे मानधन पडत आहे.
”अनेकदा कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्या-येण्याइतपतही पैसे खिशात नसतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे,” अशी व्यथा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, या कर्मचाऱ्यांना ८,००० + २,००० रुपये असे निश्चित मानधन मिळणे अपेक्षित होते. मात्र, महिने उलटले तरी या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. जोपर्यंत या वाढीव मानधनाची पूर्तता होत नाही, तोपर्यंत कामावर परतणार नाही, असा पवित्रा संघटनेने घेतला आहे.
केवळ रोजगार सहाय्यकच नव्हे, तर मनरेगामधील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही २३ जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.२३ जानेवारीपासून सर्व कार्यालयांमध्ये काळ्या फिती लावून काम केले जात आहे.१ फेब्रुवारीपासून ग्राम रोजगार सहाय्यकांसोबतच कंत्राटी कर्मचारीही आक्रमक पवित्रा घेणार आहेत.पुढील टप्प्यात तीव्र उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या संपामुळे ग्रामीण भागातील ‘मनरेगा’ची सर्व कामे पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. मस्टर न निघाल्याने मजुरांच्या हाताला काम मिळणार नाही आणि विकासकामेही रेंगाळणार आहेत. या सर्व परिस्थितीला आणि प्रशासकीय कामकाजावर होणाऱ्या परिणामांना शासनच जबाबदार राहील, असे स्पष्ट पत्र प्रशासनाला देण्यात आले आहे.









