रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे येथे एका बागेतून सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे आंबे चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालकाने पाच जणांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फणसवळे येथील शरद गंगाराम दळवी (वय ५८) यांनी तक्रार दाखल केली आहे. दळवी आणि आरोपी हे एकाच वाडीत राहणारे आहेत. ३ एप्रिल २०२५ रोजी दळवी आणि त्यांचे चुलत भाऊ त्यांच्या मालकीच्या जमीन सर्व्हे नंबर ६९१ येथे गेले होते. त्यावेळी त्यांची रखवालदार लक्ष्मी बागेची देखभाल करत होती.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपी भास्कर बाळकृष्ण दळवी, प्रसाद भास्कर दळवी, शुभांगी भास्कर दळवी, सुनिता शंकर दळवी आणि विष्णू बाळकृष्ण दळवी यांनी संगनमत करून दळवी यांच्या बागेत अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यांनी बागेतील कलमी आंब्याच्या झाडांवरील सुमारे आठ ते साडेआठ प्लास्टिक क्रेटमधील अंदाजे १५ पेटी आंबे तोडले. हे आंबे विक्रीसाठी किंवा खाण्यासाठी तयार नसतानाही तोडल्याने दळवी यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या कृत्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना ‘आम्ही कोणाला घाबरत नाही, तुला काय करायचे ते कर’ अशी धमकीही दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १८९, १९०, ३२९ (१) आणि ३२४ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.