Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत पोलिसांची ‘नाकाबंदी’ यशस्वी; ३१ जणांवर गुन्हे

रत्नागिरीत पोलिसांची ‘नाकाबंदी’ यशस्वी; ३१ जणांवर गुन्हे

३७ हजारांचा दंड वसूल

रत्नागिरी:- वर्षअखेरचा जल्लोष आणि नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रत्नागिरी पोलिसांनी राबवलेली विशेष तपासणी मोहीम यशस्वी ठरली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री शहरात ठिकठिकाणी लावलेल्या नाकाबंदीमध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, तीन तळीरामांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यात आली आहे.

शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात तपासणी करण्यात आली. वर्षअखेरचा जल्लोष आणि नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पार्ट्यांचे तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते; मात्र कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती.

पोलिसांकडून शहरातील भाट्ये, परटवणे, साळवी स्टॉप, मारूती मंदिर, भुतेनाका या परिसरात नाकाबंदी होती. या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही दुर्घटना नये यासाठी मांडवी, भाट्ये, कुर्ली समुद्रकिनारी बंदोबस्त होता. पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान २०८ वाहनांची तपासणी केली. ४४० व्यक्तींची तपासणी केली. या दरम्यान मोटारवाहन कायदाअंतर्गत ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मद्यप्राशन करून गाडी चालवताना तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३७ हजारांचा दंड वसूल केला आहे.