Sunday, August 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी ऑनलाईन शिक्षण टाळून ऑफलाईन अध्यापनावरच भर द्या

ऑनलाईन शिक्षण टाळून ऑफलाईन अध्यापनावरच भर द्या

जि. प. अध्यक्षा अस्मिता केंदे यांचे आदेश

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी आता पाठांतर आणि प्रत्यक्ष अध्यापनावर विशेष भर दिला जाणार आहे. वर्गात तासिकेदरम्यान मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ऑफलाईन शिक्षण द्यावे. आवश्यकता भासल्यास शिक्षकांनी अतिरिक्त तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा, तसेच विद्यार्थ्यांना ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ झालेच पाहिजेत, असे कडक व स्पष्ट निर्देश रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंदे यांनी दिले आहेत.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित स्थायी समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्या बोलत होत्या.

तासिकेच्या वेळी मोबाईल नको; पाठांतरावर भर द्या!
बैठकीदरम्यान जिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक अडचणी मांडल्या. त्यावर भाष्य करताना अध्यक्षांनी शिक्षकांना तासिकेच्या वेळेत मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांच्या गणितातील प्रगतीसाठी पाठांतराची सवय लावणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे दररोज तासिका सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून ३० पर्यंतच्या पाढ्यांचे सराव आणि पाठांतर करून घेतले जावे. याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईनऐवजी ऑफलाईन पद्धतीनेच विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विभागाला अलर्ट: सर्पदंशावर लस व औषधे मुबलक ठेवा!
पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण व दुर्गम भागात सर्पदंशाच्या घटना वाढण्याची दाट शक्यता असते. या मुद्द्यावर गांभीर्याने दखल घेत आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या.

जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील अँटी-व्हेनम लस व आवश्यक इंजेक्शन्स मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावीत. सर्पदंश झालेल्या रुग्णावर अजिबात वेळ न दवडता तात्काळ प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी त्वरित जिल्हा रुग्णालयात हलवावे, असे निर्देश देण्यात आले.

या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य सभापती विलास चाळके, अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे यांच्यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी व स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.