‘टीडब्लूजे’च्या फसवणुकीने जिल्हा हादरला
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दशकांत डझनभर बोगस फायनान्स कंपन्यांनी सर्वसामान्यांना ‘झटपट श्रीमंती’चे स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आता या यादीत टीडब्लूजे या शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणूक करून घेणाऱ्या कंपनीची भर पडली असून, यात चिपळूणमधील हजारो नागरिक भरडले गेले आहेत.
जिल्ह्यात यापूर्वी कन्नन फायनान्स, संचयनी, कल्पतरू, निसर्ग, पॅनकार्ड क्लब, बिटकॉईन आणि कडकनाथ यांसारख्या अनेक कंपन्यांनी अधिक परताव्याचे आमिष दाखवून हजारो लोकांची आयुष्यभराची जमापुंजी लुटली आहे. गुंतवणूकदारांच्या याच हव्यासापोटी अशा कंपन्यांचे पीक कोकणात वारंवार फोफावत असल्याचे चित्र आहे.
भपकेबाज कार्यालये आणि आलिशान राहणीमान: हे संचालक आलिशान गाड्यांमधून फिरतात आणि तालुक्याच्या ठिकाणी भव्य कार्यालये थाटतात. गुंतवणूकदारांवर भूल टाकण्यासाठी बँकॉंक, गोवा अशा ठिकाणी परदेशवाऱ्या घडवल्या जातात.
एजंटची साखळी: आकर्षक कमिशनच्या आमिषाने स्थानिक एजंट नेमले जातात. हे एजंटच ओळखीच्या लोकांकडून ‘माया’ गोळा करण्याचे काम करतात.
रिझर्व्ह बँक किंवा सेबीकडे केलेल्या अर्जाची केवळ पोचपावती आकर्षक फ्रेम करून लावली जाते. लोक या कागदपत्रांची शहानिशा न करता विश्वास ठेवतात. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला ८ ते १० टक्के परतावा दिला जातो. मात्र, गुंतवणुकीचा आकडा वाढला की परताव्याचे चेक बाऊन्स व्हायला लागतात आणि एके दिवशी कार्यालय रातोरात बंद होते. धक्कादायक बाब म्हणजे, या कंपन्यांमध्ये काम करणारे रिजनल ऑफिसर, झोनल मॅनेजर आणि डेव्हलपमेंट डायरेक्टर हेच लोक एक कंपनी बुडाली की दुसऱ्या कंपनीत जाऊन नवीन नावाने फसवणुकीचा खेळ सुरू करतात. ही साखळी जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहचलेली असून, शिक्षणाने प्रगत असलेल्या चिपळूणसारख्या शहरातही आता ‘टीडब्लूजे’मुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.









