रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महायुतीची निदर्शने

रत्नागिरी:- हिंदू धर्मियांचे आराध्य दैवतांवर ज्ञानेश महाराव यांनी टिका केली. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र गट) अध्यक्ष शरद पवार यांनी मूकसंमती दिल्याचा आरोप महायुतीतर्फे करण्यात आला. त्यांचा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजितदादा गट) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निषेध नोंदवला.

ज्ञानेश महाराव यांनी दैवतांवर वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात त्यांनी ही टीका केली. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. राजकारण करताना या विषयात हस्तक्षेप करू नये, अन्यथा अधिक उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महायुतीने दिला. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष राजन फाळके, तालुकाध्यक्ष दादा दळी, प्रशांत डिंगणकर, मंदार खंडकर, दादा ढेकणे, मनोज पाटणकर, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, प्राजक्ता रुमडे, मंदार भोळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंटी वणजू, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, बाबू म्हाप, वसंत पाटील, बंटी कीर, प्रकाश रसाळ, प्रकाश साळवी, युवा सेनेचे तुषार साळवी, सौरभ मलुष्टे, तात्या सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.