रत्नागिरी:- शासनाच्या ग्रामविकास विभागाने जातीवाचक वाड्या, वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी रत्नागिरीजिल्हा परिषदेकडून सुरु करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील १,३३१ वस्त्या, वाड्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी ग्रामसभेत विरोध केला आहे. तर जिल्ह्यातील ४१० वस्त्या, वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याच्या ठरावाला ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाने राज्याच्या ग्रामीण भागातील वस्त्या, वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तसा ठराव करून तो गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात येत आहे. या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. ही जातीवाचक नावे बदलण्यासाठी शासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे.
त्यानुसार एखाद्या वस्ती, वाडी तसेच रस्त्याचे जातीवाचक नाव बदलायचे झाल्यास संबंधित गावाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तसा ठराव करुन त्याबाबतचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी प्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात १,६६२ वस्त्या, वाड्यांची नावे जातीवाचक आहेत तर रस्ते ७९ अशी एकूण संख्या १,७४१ इतकी आहे. त्या-त्या ग्रामपंचायतींनी वाड्या, वस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यासाठी ग्रामसभा बोलावली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ३८७ वाड्या, वस्त्या आणि २३ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे ठेवण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील १,२७५ वाड्या, वस्त्या आणि ५६ रस्त्यांची नावे बदलण्यास ग्रामस्थांनी ग्रामसभेत विरोध केला. त्यामुळे १,३३१ वाड्या, वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा ठराव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे शासन निर्णय झालेला असला तरी जिल्ह्यातील १,३३१ वाड्या, वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्यात येणार नाहीत.
मंजूर, नामंजूर ठरावाची स्थिती
जातीवाचक वस्त्या – रस्ते
मंडणगड – ७० – ५७
दापोली – ४९ – १२०
खेड – १३ – १९९
चिपळूण – ४२ – १३४
गुहागर – ४४ – १४९
संगमेश्वर – ८७ – १९२
रत्नागिरी – २२ – १८०
लांजा – ५६ – १६१
राजापूर – २७ – १३९
१,७४१ वाड्या, वस्त्या, रस्त्यांची नावे जातीवाचक आहेत.









