रत्नागिरीत घरगुती वादातून मुलाकडून बापाचा खून

रत्नागिरी:- बापाला लाकडी दांड्याने मारहाण केल्याने बापाचा मृत्यू झाल्या ची घटना शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आली आहे तालुक्यातील निवेंडी येथे कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचेे उघडकीस आले आहे.

सुरेश नावजी कदम (60, रा. निवेंडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. या खुनप्रकरणी मुलगा राजेश सुरेश कदम (40, रा. निवेंडी, रत्नागिरी) याला जयगड पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी सकाळी सुरेश कदम आणि त्यांचा मुलगा राजेश यांच्यात कोणत्यातरी कौटुंबिक कारणातून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने राजेशने रागाच्या भरात वडीलांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात दांडक्याचा मार वर्मी लागल्याने सुरेश कदम यांचा मृत्यू झाला.

याबाबत जयगड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलगा राजेशला अटक करुन मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी राजेश विरोधात जयगड पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.