चंपक मैदानात ५ एकर जागा उपलब्ध
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) उद्यमनगर येथील चंपक मैदान परिसरातील पाच एकर जागा रत्नागिरी नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेवर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाकडून १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पहिल्या टप्प्यातील कामासाठी सव्वा कोटी रुपयांची निविदा नगर परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरात दररोज सुमारे २० ते २२ टन कचरा संकलित केला जातो. साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राऊंडवर उपलब्ध जागा अपुरी पडू लागल्याने शहरासाठी स्वतंत्र घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. यापूर्वी दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केल्याने तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून शहरालगतच्या उद्यमनगर येथील चंपक मैदान परिसरात एमआयडीसीची पाच एकर जागा घनकचरा प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात आली. एमआयडीसीने ही जागा आता अधिकृतपणे रत्नागिरी नगर परिषदेकडे हस्तांतरित केली आहे. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात प्रकल्पासाठी आवश्यक शेड उभारण्यात येणार असून, त्यासाठी नगर परिषदेकडून सव्वा कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. शहरालगतच्या नाचणे, मिऱ्या आणि शिरगाव या ग्रामपंचायतींकडून संकलित होणारा कचराही या प्रकल्पात स्वीकारला जाणार आहे.









