४ कामे ठप्प, ४ संथगतीने!
रत्नागिरी:- कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या खारभूमी विकासकामांचा पुरता बोजवारा उडाल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. शासनाकडून तब्बल २७ कोटी ५७ लाख ३३ हजार ३२५ रुपयांचा भरघोस निधी मंजूर होऊनही जिल्ह्यातील आठपैकी चार खारभूमी योजनांची कामे पूर्णपणे ठप्प आहेत. तर उर्वरित चार योजनांची कामे अत्यंत कासवगतीने सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या कोट्यवधींच्या कामांच्या ‘वित्तीय प्रगती’बाबत खुद्द खारभूमी विभागालाच कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे उघडकीस आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन व खारभूमी भागातील शेती आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये खारभूमी योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या सर्व कामांसाठी सुमारे २७.५७ कोटी रुपयांची निविदा मंजूर करून ही कामे पूर्ण करण्यासाठी १६ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय उदासीनता आणि ठेकेदारांच्या मनमानीमुळे ही मुदत केवळ कागदावरच राहिली आहे. प्रत्यक्षात बहुतांश कामे रखडली असून काही ठिकाणी तर काम सुरूच झालेली नाहीत.
सुरू असलेल्या कामांची संथ भौतिक प्रगती
सध्या जिल्ह्यात केवळ ४ ठिकाणी कामे सुरू असून त्यांची भौतिक प्रगती अत्यंत निराशाजनक आहे. यात कर्ला खारभूमी योजना (रत्नागिरी) ५८ टक्के, कासारवेली खारभूमी योजना (रत्नागिरी) ५५ टक्के, पोमेंडी खारभूमी योजना (रत्नागिरी) २८ टक्के आणि काजरवाडी खारभूमी योजना (रत्नागिरी): २७ टक्के
चार योजनांची प्रगती 'शून्य टक्के'!
दुसरीकडे, जिल्ह्यातील इतर चार महत्त्वाच्या खारभूमी योजनांची भौतिक प्रगती ‘शून्य टक्के’ नोंदवली गेली आहे. यामध्ये पुढील योजनांचा समावेश आहे. नांदिवडे (तालुका रत्नागिरी), गावखडी (तालुक रत्नागिरी), माळवी (तालुका दापोली) आणि पेवे उंबरशेत (तालुका मंडणगड) या ठिकाणी निविदा आणि निधी मंजूर असूनही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवातच करण्यात आलेली नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असूनही आणि मुदत संपत आली तरी ही कामे संथगतीने सुरू आहेत.शेतीचे मोठे नुकसान होत आहे. कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांमधून केली जात आहे.









