रत्नागिरीत गांजा बाळगणाऱ्या तिघांना अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी:- जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक शहरात गस्त घालत होते.

शनिवारी, २६ एप्रिल रोजी, पथकाला पटवर्धन वाडी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्गावर उद्यमनगर येथे दोन दुचाकींवर तीन व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळल्या. पोलिसांनी तत्काळ त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. या गांजाचे वजन ३५३ ग्रॅम इतके होते.

पोलिसांनी घटनास्थळीच अत्ताउल्ला सलिम पटेल (वय ३५, रा. उद्यमनगर), फहाद मुस्ताक पाटणकर (वय २७, रा. शिवाजीनगर), आणि आयान अजिज मुल्ला (वय २४, रा. उद्यमनगर) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींच्या ताब्यातून ३५३ ग्रॅम गांजा, दोन दुचाकी (एमएच-०८ एटी-६७९२ व एमएच-०८ एव्ही-४६३०) आणि चार मोबाईल फोन असा एकूण २,२३,३५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिरी आणि अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार, पोलीस हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, अमित कदम, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर, योगेश शेट्ये, भैरवनाथ सवाईराम, सत्यजित दरेकर आणि महिला पोलीस हवालदार वैष्णवी यादव यांच्या पथकाने केली.