रत्नागिरीतून 792 डझन आंबा कतार, इंग्लंडला रवाना 

पंंधरा दिवस आधीच गाठला निर्यातीचा मुहूर्त

रत्नागिरी:-वातावरणातील अनियमिततेमुळे यंदा हापूसच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच यंदा रत्नागिरीतील आंबा निर्यात केंद्रातून 792 डझन आंबा कतार आणि इंग्लडला रवाना झाला. उत्पादन कमी असतानाही पंधरा दिवस आधीच निर्यातीला सुरुवात झाली असून स्थानिक बागायतदारांसाठी हा दिलासा आहे.

रत्नागिरीतून थेट हापूसची निर्यात व्हावी यासाठी आंबा निर्यात केंद्राची स्थापना केली होती. गेली तीन वर्षे हे केंद्र खासगी तत्त्वावर सद्गुरु एंटरप्रायझेसला चालवण्यासाठी देण्यात आले आहे. गतवर्षी कोरोनामुळे निर्यातीसाठी अपेक्षित आंबा मिळाला नव्हता. यंदा जास्तीत जास्त निर्यात व्हावी या उद्देशाने पावले उचलण्यात आली आहेत. आखाती देशांना कोणत्याही प्रकारची प्रक्रिया लागत नाही; मात्र युरोपसह अन्य देशांना विविध प्रक्रिया आवश्यक आहेत. यामधील इंग्लंडला पाठविण्यात येणार्‍या उष्णजल प्रकियेत शिथिलता मिळाल्याचा फायदा स्थानिक बागायतदारांना होणार आहे. त्याची सुरवात झाली असून रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून थेट निर्यात सुरु झाली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील तीन बागायतदारांकडील 426 डझन आंबा कतार आणि 366 डझन इंग्लंडला रवाना झाले आहेत. चार दिवसांपुर्वी प्रक्रिया करण्यासाठी आंबा केंद्रात दाखल झाला होता. प्रतवारी, वॉशिंग, ब्रशिंग आणि कुलींग केल्यानंतर तो गुरुवारी (ता. 25) हवाई मार्गे रवाना झाला आहे. बागायतदारांना जागेवर 750 ते 800 रुपये डझन इतका दर दिल्याची माहिती मिळाली आहे. सध्या स्थानिक बाजारात दर चढे आहेत. इंग्लंडमध्ये 18 ते 19 पौंड (भारतीय चलनानुसार 1800 रुपये) इतका मिळत असल्याचे तेथील व्यावसायिकांनी सांगितले. निर्यातीसाठीचे फायटो सर्टिफिकेट सध्या मुंबईतील विमानतळावरच घेण्यात आले आहे. ते सर्टिफिकेट रत्नागिरीतील जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून मिळणार आहे.