रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात होणारी हेल्मेट सक्ती दुचाकी वाहनधारकांना डोकेदुखी ठरत असून नागरिकांमध्येही असंतोष आहे. वाहतूक निरीक्षक किंवा पोलिस अधीक्षकांना भेटून ही सक्ती मागे घ्यावी, अशी विनंती करू अन्यथा पालिकेच्या गाळ्यामध्ये नाममात्र भाडेतत्त्वावर असलेले वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाचा करार रद्द करू, असा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
रत्नागिरी शहरातील हेल्मेट सक्तीबाबत अनेक दिवसांपासून नागरिक आणि वाहनधारकांमध्ये चीड आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरातही हेल्मेट सक्ती नाही. जिल्ह्यात कोणत्याही शहरामध्ये हेल्मेट सक्ती नाही. रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती का, असा सवाल नागरिक करत आहेत. हेल्मेट सक्तीमुळे वाहतूक पोलिसांचा मूळ उद्देश बाजूला पडत आहे. वाहतूक कोंडी सोडविणे, नो पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग करणार्यांवर कारवाई, वाहनधारकांना पार्किंग दाखविणे आदी कामांचा पोलिसांना जणू विसरच पडला आहे. रस्त्याच्या बाजूला दोन कर्मचारी उभे राहतात आणि विना हेल्मेट कोण येतो का? हे शोधण्याचीच त्यांची ड्यूटी आहे का? असे चित्र निर्माण झाले आहे. कोणाची किती अडचण असली तरी कायद्यावर बोट ठेवले जाते. सकाळी 30 रुपयाचे दूध आणण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वाराला 500 रुपयाचा दंड केला जातो. जनतेमध्ये याबाबत असलेल्या रोषाबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनीदेखील हेल्मेट सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती; मात्र त्याचाही विचार झाला नाही. शहरात फिरताना नागरिकांना हेल्मेट सतत बाळगावे लागत आहे.









