मुदत संपण्यास 2 महिन्यांचाच कालावधी; केवळ 15 टक्के काम मार्गी
रत्नागिरी:- हायटेक बसस्थानके करण्याच्या राज्य सरकारचे पहिल्या टप्प्यातील प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. रत्नागिरी शहर व ग्रामीण बसस्थानकाच्या कामाची मुदत संपण्याला दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असताना केवळ १५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सुमारे दहा कोटी रुपयांचा प्रकल्प केवळ कागदावरच राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांची गैरसोय होत असताना सरकारकडून या प्रकल्पाला निधी देण्यात येत नसल्याने काम रखडले आहे.
रत्नागिरी बसस्थानक बांधा, वापरा, हस्तातरीत करा या तत्वावर बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री व विद्यमान उच्च तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भूमीपुजन केले होते. त्यानंतर आलेल्या भाजपा, शिवसेना सरकारने बीओटी पध्दत रद्द करुन राज्य सरकारच्या निधीतून बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला होता.
तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हायटेक बसस्थानकाचा प्रकल्प हाती घेत जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, लांजा या बसस्थानकांना मंजुरी दिली होती. त्यानंतर रत्नागिरीतील बसस्थानकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. दि.२३ जानेवारी २०१८ ला ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. सुमारे दहा कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प दि.२३ जानेवारी २०२१ ला पूर्ण करण्याची अट राज्य सरकारने घातली होती. कामाची मुदत संपण्याला दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असताना केवळ १५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
ठेकेदाराला झालेल्या कामाचा आवश्यक तेवढा मोबदला देण्यासाठी निधी उपलब्ध नाही त्यामुळे ठेकेदाराने काम करणे बंद केले आहे.
बसस्थानकातून शहर , ग्रमीण भागात फेऱ्या सुरु होत्या. ग्रामीण भागातील फेऱ्या सध्या रहाटाघर येथून सोडण्यात येतात. परंतु बसस्थानका समोर रस्त्यावर असलेला थांबा वाहतूकीला अडथळा होत असून प्रवाशांच्या जिवीताला धोकादायक ठरला आहे. लॉकडाऊन काळात वाहतूक बंद असल्याने फारसा परिणाम झाला नव्हता. परंतु पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी ठेकेदाराला वारंवार स्मरणपत्रे पाठविली आहेत. कामगार नसल्याचे कारण ठेकेदारामार्फत देण्यात येत आहे. तर दोन महिन्यांनी कामाची मुदत संपणार आहे. तरीहि ठेकेदाराने कामाला मुदतवाढ मागितलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या हायटेक बस स्थानकाचे नेमके काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.