रत्नागिरी:- वसमत मार्केट यार्डातील संजरी ट्रेंडिग कंपनीकडुन माळनाका येथील व्यापाऱ्याने हळद घेत कोईम्बतुर येथील व्यापाऱ्याशी हळदीचा व्यापार करत १५ लाख ७३ हजाराचा माल दिला. त्यापैकी १ लाख रुपयेच मिळाले, बाकी रक्कमेचा धनादेश वटलाच नसल्याने रत्नागिरी येथे प्रथम गुन्हा दाखल करुन, नंतर वसमत शहर पोलीस ठाण्यात तपास वर्ग करण्यात आला आहे.
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यासह पर राज्यातून हळद विक्रीसाठी येत आहे. मार्केट यार्डातील संजरी ट्रेंडिग कंपनीने २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान फिर्यादी अमित कांतीलाल ओसवाल रा. माळनाका रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी यांनी हळद घेत, आरोपी सायमन जोसेफ बेसकी रा. कोईम्बतुर राज्य तामिळनाडु यांना विक्री केली होती.
विक्री व्यवहारापोटी आरोपीने फिर्यादीस १ लाखाचा एनएफटी केला होता. बाकी १४ लाख ७३ हजार ४७७ रुपयाच्या रक्कमेसाठी त्यांना वारंवार फोन केला. मात्र त्यांना अद्यापपर्यत रक्कम दिली नाही. यामुळे फिर्यादीने देण्यात आलेला धनादेश बँकेत टाकला असता तो अपुऱ्या रक्कमेअभावी परत आला. फिर्यादीस उर्वरित रक्कम देतो असे म्हणत दिली नाही.
या प्रकरणी फिर्यादी अमित ओसवाल यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनास्थळ वसमत असल्याने सदरील गुन्हा वसमत शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास फौजदार बाबासाहेब खार्डे, कृष्णा चव्हाण, शंकर हेंद्रे, बालाजी मिरासे करित आहेत. शहर पोलिसांचे एक पथक तपास कार्यासाठी तामिळनाडु राज्यात रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.









