रत्नागिरी:- स्वर्गिय रतन टाटा यांनी सीएसआरमधून मंजूर केलेल्या स्कील डेव्हलमेंट सेंटरचे भूमीपूजन, थिबापॅलेस येथील थ्रीडी मल्टीमिडिया शोचा शुभारंभ, भगवती बंदर येथील शिवसृष्टी टप्पा-2चा शुभारंभ दि.17 मार्च रोजीज राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वगय रतन टाटा यांनी सीएसआरमधून रत्नागिरी जिल्ह्यासाठी स्कील डेव्हलमेंट सेंटर मंजूर केले होते. रत्नागिरीतील उद्यमनगर चंपक मैदान येथे या सेंटरची उभारणी होणार असून दि.17 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता या सेंटरचे भूमीपूजन ना.अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 8.15 वाजता थिबापॅलेस येथील थ्रीडी मल्टीमिडिया शोचा शुभारंभ ना.पवार यांच्या हस्ते होईल. त्यानंतर सायंकाळी 9 वाजता भगवती बंदर येथील शिवसृष्टी टप्पा-2 कामाचा ना.पवार यांच्या हस्ते शुभारंभ होईल. याच दिवशी तिथीप्रमाणे शिवजयंती आहे. शिवसेनेच्या वतीने शिवजयंती भव्यदिव्य स्वरूपात जल्लोषात साजरी केली जाणार आहे. स्कील डेव्हलपमेंट सेंटरच्या भूमीपूजन सोहळ्याला जिल्ह्यातील अभियांत्रिकी क्षेत्रातील सुमारे अडीच हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.