सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले; चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद
रत्नागिरी:- शहरातील श्रीराम मंदिरातील सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही चोरी सोमवारी सकाळी ७.२७ वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. चोरीचा प्रकार उघड होताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासासाठी पोलीस पथके गठीत केली आहेत, चोरटा लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल, असा विश्वास शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी व्यक्त केला.

चोरीप्रकरणी मंदिर व्यवस्थापनाने पोलिसात खबर दिली आहे. चोरटा सीसीव्हीमध्ये कैद झाला असून त्याअनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध श्रीराम मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याठिकाणी भाविकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. या मंदिरात सध्या नवरात्र उत्सवाचीदेखील धामधूम सुरु आहे. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. मात्र सोमवारी सकाळी मंदिरात मूर्तीवरील दागिन्यांच्या चोरी प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली.
सकाळच्या वेळेत कोणी नसल्याचे पाहून लाल रंगाचे शर्ट आणि काळी फुलपॅन्ट परिधान केलेल्या एका अनोळखी दाढीधारी तरुणाने मंदिरात प्रवेश केला. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्याने गाभाऱ्यातील मूर्तीजवळ जात सीतामाईच्या गळ्यातील दागिना क्षणार्धात खेचून आपल्या खिशात टाकत तेथून पोबारा केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
सकाळी पुजारी मंदिरात दाखल होताच त्यांनी मूर्तीवरील दागिन्यांची पारख केली. त्यावेळी सीतामाईच्या गळ्यात मंगळसूत्र सीतामाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लगेचच त्यांनी ही बाब मंदिर व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली. पदाधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मंदिरात धाव घेतली. घडला प्रकार पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. लगेचच मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कोणीतरी अनोळखी तरुणाने मंदिरात घुसून हे कृत्य केल्याचे समोर आले. या घटनेची खबर मंदिर व्यवस्थापनाने पोलिसात दिली. त्यानुसार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या तरुणाचा शोध सुरू करण्यात आला.
मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
चोरीची घटना सकाळी ७.२७वाजण्याच्या सुमारास घडल्याचे मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. यावेळी मंदिरामध्ये कोणीही नसल्याचा गैरफायदा चोरट्याने उठविल्याचे दिसून येत आहे. एक चोरटा मंदिरामध्ये प्रवेश करून चोरी करून निघून गेल्याने या मंदिराच्या सुरक्षा झाले आहे.