रत्नागिरीतील मोकाट गुरे पकडण्याची मोहीम रविवारपासून

वेळप्रसंगी गुरेमालकांवर गुन्हे दाखल करणार

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर व परिसरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम रविवार 17 सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पाच पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, उनाड गुरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गणेशोत्सवात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मोकाट जनावरे पकडून ती चंपक मैदानात तात्पुरत्या स्वरुपात बंदिस्त केली जाणार आहेत. याठिकाणी तारांचे कंपाऊंड उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गुरांना पाऊस व ऊनाचा त्रास होऊ नये यासाठी शेडही बांधली जाणार आहे. याठिकाणी गुरांच्या चारा, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. दिवसरात्र देखभालही केली जाणार आहे. जिल्हाप्रशासन, पोलीस यंत्रणा, नगर पालिका, पशुसंवर्धन विभाग व एनजीओांकडून ही मोहीम राबवली जाणार आहे. शहर परिसरात सुमारे 250 ते 300 जनावरे असून त्यातील 20 ते 25 गुरे ही लम्पीने ग्रस्त असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे मोकाट गुरांना लम्पीचा त्रास होऊ नये म्हणून लम्पीग्रस्त गुरांना वेगळे ठेवले जाणार आहे. त्यांच्यावर औषधोउपचार पशुसंवर्धन विभागाकडून केले जाणार आहेत.

उनाड गुरे पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली असून त्या प्रत्येक पथकात 10 लोकांचा समावेश असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
पकडलेली गुरे जर शेतकर्‍यांना पाहिजे असतील तरी ती त्यांना देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या शेतकर्‍यांची गुरे आहेत, त्यांनी ती घेऊन जावीत अन्यथा अशा शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.

रत्नागिरी शहराप्रमाणेच राजापूर शहरामध्येही उनाड गुरांचा प्रश्न असून, त्याबद्दलही तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीप्रमाणेच राजापुरातही उनाड गुरे पकडण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.