रत्नागिरी:- कोकणच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पूर्णगड किल्ल्याला पुरातत्त्व विभागाकडून नवा साज मिळाला आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला असून नूतनीकरणामुळे कोरोनानंतर किल्ल्यावर दिवसाला शंभरहून अधिक पर्यटक भेटी देत आहेत. सुशोभीकरणामुळे पर्यटकांचा ओघ भविष्यात वाढणार आहे.
सरकारने राज्यातील काही गड राज्य संरक्षित करत त्यांच्या जतनाचा आराखडा तयार केला. त्यामध्ये तालुक्यातील पूर्णगड किल्ल्याचाही समावेश होता. 4 कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला. यामधील कामे पूर्ण झाली असून नव्या किल्ल्याचा जुना साज तसाच ठेवत डागडुजी केलेला किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर वॉकिंग ट्रॅक बांधण्यात आला आहे. त्यामुळे गडावरून समुद्राला येऊन मिळणार्या मुचकुंदीचे विस्तीर्ण खाडी पात्र आणि दुसर्या बाजूला पसरलेला समुद्र असे विलोभनीय दृश्ये अनुभवयाला मिळत आहे. रात्रीच्या वेळी हा किल्ला बंद ठेवण्यात येणार असून देखभालीसाठी किल्ल्यावर दोन कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. किल्ल्यावर येणार्या पर्यटकांना या कर्मचार्यांच्या माध्यमातून पूर्णगडाची माहिती देण्याची व्यवस्था केली आहे. हा किल्ला डागडुजीनंतर आता नव्या रुपात पर्यटकांसाठी खुला झाला आहे. मुख्य भागातून समुद्राकडील बाजूला जाण्यासाठी तटबंदीत आकर्षक दगडी दरवाजा आहे. पूर्वी या समुद्राकडील तटबंदीच्या पलीकडे जाता येत नव्हते, पण डागडुजीनंतर तशी सुविधा केली आहे.









