रत्नागिरीतील तरुणाला परजिल्ह्यातील तरुणांकडून गंभीर मारहाण

किरकोळ कारवाई करणार्‍या जयगड पोलिसांविरोधात तरुणाची पोलीस अधीक्षकांकडे धाव

रत्नागिरी:- पैशाची मागणी करीत दोन तरुणांना सातार्‍यातील काही तरुणांनी गाडी घालून मारहाण केल्याची घटना रत्नागिरीत काही दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल करताना, फक्त मारहाणीची तक्रार घेतली. मात्र गंभीर जखमी तरुणाची साधी चौकशी किंवा जवाबही नोंदवला नसल्याचा आरोप या तरुणाने केला असून याप्रकरणाची सखोल चौकशी करुन गुन्हा नोंदवावा अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे तरुणाने केली आहे.

याप्रकरणी रत्नागिरी येथे राहणार्‍या रोहन गजेंद्र शिर्के याने पोलीस अधीक्षकांना निवेदनासह स्वत:ला झालेल्या मारहाणीचे फोटो, वैद्यकीय दाखलाही सादर केला आहे.

निवेदनात रोहन शिर्के याने म्हटले आहे की, 19 जून रोजी रात्री साडेदहा वाजता आपला मित्र मुक्कदर अक्रम जमादार यांच्यासह आपल्याला आठ ते दहाजणांनी मारहाण केली. यावेळी 20 लाखाची मागणी केली. त्याचप्रमाणे आपल्याला दोन वेळा बांधूनही ठेवले. या व्यक्तींनी खिशातील साडेआठ हजार रुपये, अंगठी, चेनही काढून घेतली. त्यानंतर फॉर्च्युनर गाडीने आपल्याला कारवांचीवाडी येथे सोडले होते. या दरम्यान त्याला पीव्हीसी पाईप, काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात त्याल दोन ठिकाणी फॅक्चर झाले व गंभीर दुखापती झाल्या आहेत.

रोहन याला नातेवाईकांनी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रुग्णालयाने याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी येऊन 21 जून रोजी जवाब नोंदवला. परंतु 22 जून रोजी रोहन शिर्के याची तक्रार घेण्याऐवजी मुक्कदर जमादार याची फिर्याद नोंदवून मारहाणीचा किरकोळ स्वरुपाचा गुन्हा दाखल केला. यात दोन-तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची जामिनावर सुटका होईल अशा पध्दतीने जयगड पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप रोहन शिर्के यांनी केला आहे.

रोहन शिर्के यांच्यावर ज्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी गंभीर दुखापतीचे वैद्यकीय प्रमाणपत्रही दिले असून तेही पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनासोबत जोडण्यात आले आहे.

याप्रकरणात जयगड पोलीस स्थानकाचे कर्मचारी राहूल घोरपडे यांनी रोहन शिर्के यांच्याकडे साधी विचारणा न करता फक्त मोबाईलवर शुटींग करुन ते निघून गेल्याचेही रोहन शिर्के यांनी म्हटले आहे. याप्रकरणात जयगड पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली असून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रोहन शिर्के यांनी केली आहे.