रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे छोटी हॉटेल्स आणि मेस जवळजवळ बंद झाली आहेत. तर 40 टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे. ही परिस्थिती न सुधारल्यास उर्वरित हॉटेल्सही बंद करण्याच्या मार्गावर आहेत. गॅसअभावी गरीब जनतेची भूक भागवणाऱ्या ‘शिवभोजन’ केंद्रांनाही मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यात ८ मार्चपासून जिल्ह्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. एका मध्यम हॉटेलला सरासरी रोज किंवा दोन दिवसाआड एका सिलिंडरची गरज भासते; मात्र, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने व्यवसायाचे गणित कोलमडले आहे. रत्नागिरीतील २५०हून अधिक हॉटेल व्यावसायिक या टंचाईमुळे हवालदिल झाले आहेत. गॅसअभावी हॉटेल चालकांनी सुरवातीला पारंपरिक चुलीवर जेवण सुरू केले; परंतु त्यालाही मर्यादा असल्याने त्यांची आता सहनशीलता संपली आहे. पर्याय म्हणून अनेकांनी इंडक्शन शेगड्या आणि डिझेल भट्ट्यांसारखे पर्याय स्वीकारले आहेत; मात्र, यामुळे उत्पादनाचा खर्च भरमसाट वाढला आहे.
सध्या परीक्षा संपल्या असून, पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. मोठ्या संख्येने पर्यटक रत्नागिरीत दाखल होत आहेत; मात्र, त्यांना पाहुणचार देण्यासाठी पुरेसा गॅस उपलब्ध नसल्याने हॉटेल व्यावसायिकांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. काही हॉटेल्स सध्या अर्धवेळ सुरू आहेत तर काहींनी आपला कारभार पूर्णपणे थांबवला आहे. गॅस तुटवड्याचा मोठा फटका छोटी हॉटेल्स आणि मेस चालवणाऱ्यांना बसला आहे. सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने छोटी हॉटेल्स आणि मेस बंद करण्याची नामुष्की अनेकांवर ओढवली आहे. आता थेट जिल्हा पुरवठा विभागाकडे अनेकांनी मागणी केली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे काही प्रमाणात सिलिंडरचा पुरवठा झाला होता; परंतु पुन्हा परिस्थिती गंभीर झाली आहे.









